महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील काही मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केल्याने या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याकडे कोणतंही ओबीसी प्रमाणपत्र नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिलं आहे. “काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. (politics) माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र आणि बारामतीच्या खासदार असल्याचं प्रमाणपत्र आहे. मात्र, ओबीसी प्रमाणपत्र आपल्याकडे नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसकडून दररोज अशा प्रकारचे आरोप का केले जात आहेत, याबाबत आश्चर्य वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
आपल्याला काँग्रेसकडून सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. “माझ्याकडे कोणतंच ओबीसी प्रमाणपत्र नाही. काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं,” असं म्हणत त्यांनी वडेट्टीवारांच्या दाव्याला थेट आव्हान दिलं. या आरोपांमागे महाराष्ट्र काँग्रेसची भूमिका काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. (politics) दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी केवळ सुप्रिया सुळे यांचंच नाव घेतलेलं नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा संदर्भ देत राज्यातील अनेक मराठा नेत्यांकडे अशा प्रकारची प्रमाणपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला. शरद पवार यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
या संपूर्ण वादावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीला नियमांनुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळत असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “नियमाने प्रमाणपत्र मिळत असेल तर हरकत काय?” अशी भूमिका दानवे यांनी मांडली. वडेट्टीवारांचा दावा आणि त्यावर सुप्रिया सुळे यांनी दिलेलं प्रत्युत्तर यामुळे ओबीसी प्रमाणपत्राचा मुद्दा आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. (politics) त्यामुळे वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्याचे पुरावे काय, तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे खरंच ओबीसी प्रमाणपत्र आहे का, याबाबत पुढे काय खुलासा होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?