फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमान प्रवासात बुधवारी थरारक घटना घडली. तब्बल 174 प्रवासी आणि क्रू सदस्यांसह आकाशात असलेल्या विमानात कॉकपिटमध्येच दोन पायलटमध्ये झटापट सुरू झाली. ओमानच्या को-पायलटने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. (incident) त्यानंतर विमानाची उंची काही क्षणांत हजारो फुटांनी कमी झाली. मात्र गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छार यांनी प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले आणि त्यामुळे प्रवाशांना आत पोहोचून हल्लेखोराला रोखता आले. या संपूर्ण थरारामुळे मोठी दुर्घटना टळली.

फ्लाइट FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने निघाले होते. प्रवास सुरळीत सुरू असताना काही तासांनंतर कॉकपिटमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. उपलब्ध माहितीनुसार, ओमानच्या को-पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. (incident) याच वेळी विमान वेगाने खाली येऊ लागले. सुमारे 33 हजार फुटांवर असलेले विमान काही वेळातच 17 हजार फुटांपर्यंत खाली आले. प्रवाशांना विमान प्रचंड वेगाने खाली जात असल्याचे जाणवू लागल्याने विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटचे दार उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील काही प्रवासी कॉकपिटमध्ये धावले आणि त्यांनी हल्लेखोर को-पायलटला पकडून नियंत्रणात आणले. इस्रायली प्रवासी यनिव चायोन यांनीही या प्रसंगात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वृत्त आहे. विमान अचानक खाली येत असताना त्यांनी कॉकपिटमध्ये जाऊन नियंत्रण स्थिर करण्यासाठी मदत केली. त्यानंतर विमानातील अतिरिक्त पायलटांनी नियंत्रण हाती घेतले.
या घटनेनंतर विमानाला सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील 174 प्रवाशांसह इतर क्रू सदस्य सुरक्षितपणे खाली उतरले. कॅप्टन स्मित मच्छार आणि हल्लेखोर को-पायलट यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय दूतावासाने मच्छार यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळत असल्याचे सांगितले होते. (incident) त्यानंतर त्यांना अबू धाबी येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
या घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मच्छार यांना ‘खरा हिरो’ म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रुग्णालयातून मच्छार यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.
दरम्यान, या घटनेमागील नेमका हेतू अद्याप तपासाचा विषय आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ही घटना विमान पाडण्याचा प्रयत्न किंवा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले असले, तरी तपास यंत्रणांनी हल्ल्यामागील कारण अद्याप निश्चित केलेले नाही. सौदी अरेबिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि इतर संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रसंगावधानामुळे, प्रवाशांच्या धाडसामुळे आणि अतिरिक्त पायलटांच्या मदतीमुळे 174 जणांचा जीव वाचला. आकाशात काही क्षणांत निर्माण झालेल्या या जीवघेण्या संकटावर मात करत विमान तबूक येथे सुरक्षित उतरले आणि त्यामुळे मोठी विमान दुर्घटना टळली.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती