तुमच्या स्वयंपाकघरात एव्हरेस्ट जिरे पावडर असेल, तर ती वापरण्यापूर्वी पॅकेटवरील बॅच नंबर नक्की तपासा. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAIने एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्सच्या प्री-पॅक्ड जिरे पावडरच्या एका विशिष्ट बॅचविरोधात मोठी कारवाई केली आहे. (Jeera Powder) प्रयोगशाळेतील तपासणीत या बॅचमध्ये परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशकांचे अवशेष आढळल्यानंतर संबंधित उत्पादन ‘असुरक्षित’ घोषित करण्यात आले असून संपूर्ण बॅच बाजारातून तातडीने परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

FSSAIच्या कारवाईनुसार, एव्हरेस्ट जिरे पावडरच्या या बॅचमध्ये अझॉक्सीस्ट्रोबिन आणि थियामेथॉक्सम या कीटकनाशकांचे अवशेष निर्धारित कमाल मर्यादेपेक्षा जास्त आढळले. प्राथमिक तपासणीनंतर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ अंतर्गत नमुना असुरक्षित ठरवण्यात आला. (Jeera Powder) त्यानंतर संबंधित अन्न व्यावसायिकाला अपीलची संधी देण्यात आली आणि नमुना रेफरल फूड लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला. या प्रयोगशाळेच्या तपासणीतही दोन्ही कीटकनाशकांचे प्रमाण अनुमत मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निश्चित झाले.
या प्रकरणातील नियामक नमुना गोव्यातील मे. रिव्हरसाइड रिसॉर्ट्स अँड हॉलिडे होम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरातून घेण्यात आला होता. तपासणीत दोष आढळल्यानंतर FSSAIने एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्सला संबंधित संपूर्ण बॅच बाजारातून परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीला रिकॉल केलेल्या उत्पादनांची संपूर्ण नोंद ठेवणे, संबंधित माहिती आणि स्थिती अहवाल सादर करणे तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे FSSAIची ही कारवाई एव्हरेस्टच्या सर्व जिरे पावडर उत्पादनांवर लागू नाही. केवळ E080668761 या बॅच क्रमांकाच्या उत्पादनाचा रिकॉल करण्यात आला आहे. (Jeera Powder) त्यामुळे तुमच्या घरात एव्हरेस्ट जिरे पावडर असल्यास पॅकेटवरील बॅच नंबर काळजीपूर्वक तपासा. हा नंबर E080668761 असल्यास ती जिरे पावडर वापरू नका आणि संबंधित उत्पादन बाजारात विकले जात असल्यास त्याची माहिती संबंधित अन्न सुरक्षा यंत्रणेला देणे योग्य ठरेल.
दरम्यान, अन्न भेसळ आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत देशभरात अन्न सुरक्षा यंत्रणांकडून तपासण्या आणि कारवाया सुरू आहेत. FSSAIनेही अन्न व्यवसायांमधील नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अंमलबजावणीची कारवाई वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांनी पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना उत्पादनाची बॅच, वैधता तारीख आणि पॅकेटवरील इतर आवश्यक माहिती तपासूनच त्याचा वापर करणे महत्त्वाचे ठरत आहे.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय