कोल्हापूर ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

ऊस दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत महामार्ग रोको आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनाला जवळपास २४ तास उलटूनही वाहतूक पूर्ववत झालेली नसल्याने हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत. (farmers) त्यातच कोल्हापूरच्या भाजीपाला बाजारात आवक घटल्याने दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले असून, कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या १०० हून अधिक एसटी बसही रद्द करण्यात आल्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळावा आणि विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, (farmers) यासाठी कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, कोल्हापुरातील लक्ष्मी टेकडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात हजारो ट्रक आणि कंटेनर अडकून पडले आहेत. या वाहनांमधून विविध राज्यांमध्ये मालाची वाहतूक केली जाते. मात्र, महामार्ग ठप्प झाल्याने माल वेळेत पोहोचवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. वाहनचालक आणि क्लीनर यांनाही खाण्यापिण्याच्या सुविधांअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या आंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूरच्या भाजीपाला बाजारावरही दिसू लागला आहे. बेळगाव, गटप्रभा आणि आसपासच्या परिसरातून कोल्हापूरच्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाची वाहतूक करणारे ट्रक अडकून पडले आहेत. परिणामी, बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली असून, किरकोळ आणि घाऊक बाजारात दरवाढ झाली आहे. भेंडीचे दर किलोमागे ८० रुपयांवरून १०० रुपये, ढबू मिरचीचे दर ७० रुपयांवरून ८० रुपये, गाजराचे दर ६५ रुपयांवरून ८० रुपये, तर वांग्याचे दर ८५ रुपयांवरून १०० रुपये झाले आहेत. वाटाण्याचे दर १८० रुपयांवरून २०० रुपये आणि बीन्सचे दर ९० रुपयांवरून १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. हिरव्या मिरचीचे दरही ७० रुपयांवरून ८० रुपये किलो झाले आहेत.

घाऊक बाजारातही दरवाढीचा परिणाम जाणवत आहे. फुलकोबीचा दर २०० रुपयांवरून ३५० रुपये, तर कोबीचा दर ६० रुपयांवरून १०० रुपये झाला आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी आता १५ रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच, १० किलो वांग्यांचा दर ५०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढला आहे. वाहतूक सुरळीत होण्यास विलंब झाल्यास भाजीपाल्याच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना या दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेवरही परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या १०० हून अधिक एसटी बस मंगळवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामानिमित्त, नोकरीसाठी किंवा अन्य कारणांसाठी बेळगावला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. बेळगावच्या दिशेने बससेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना कोल्हापूर एसटी स्थानकातच थांबावे लागत आहे. प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. एकीकडे ऊसदराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम मालवाहतूक, भाजीपाला बाजार आणि सार्वजनिक वाहतुकीवर होत आहे. आंदोलनाचा तिढा कधी सुटणार आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कधी पूर्ववत होणार, याकडे वाहनचालक, व्यापारी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी

पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ

पावसाळा संपला, तरी माणगंगेची तहान भागेना नदीपात्र कोरडे ठाक