महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही हवामान प्रणाली सोमालियाच्या किनाऱ्याकडे सरकण्याचे संकेत आहेत. (Maharashtra) दरम्यान, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील कमाल तापमानात सध्या चढ-उतार सुरू असून, अनेक भागांत तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळ आणि अमरावती येथेही तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील (Maharashtra) काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील उर्वरित भागांत मात्र ढगाळ हवामानासोबत उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra) त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. वादळी पावसाचा अंदाज असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
संपूर्ण सांगली जिल्ह्याचा दुष्काळाच्या कक्षेत समावेश