ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील इतर १३ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज दिली.

सोनोवाल यांनी एक्सवर पोस्ट करून या हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘एमएसव्ही अल जुसुफी’ असे हल्ला झालेल्या भारतीय जहाजाचे नाव असून,(Indian ship) त्यावर एकूण १४ भारतीय खलाशी होते. क्षेपणास्त्र हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून, इतर १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हे भारतीय खलाशी आहेत. उपचार सुरू असताना एका खलाशाचा मृत्यू झाला. गंधार नहीम अजीज असे मृत्युमुखी पडलेल्या खलाशाचे नाव आहे. ते मूळचे गुजरातमधील रहिवाशी होते, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.
२ नोव्हेंबर रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना जहाजावर एक क्षेपणास्त्र आदळले. हा हल्ला नेमका कोणी याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, असेही सोनोवाल यांनी सांगितले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गुजरातमधील खलाशाच्या निधनाबद्दल सोनोवाल यांनी शोक व्यक्त केला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ओमानच्या तटरक्षक दलाने जहाजावरील उर्वरित १३ खलाशांची सुरक्षित सुटका केल्याचेही सोनोवाल यांनी सांगितले. या हल्ल्यातून बचावलेल्या खलाशांना आवश्यक मदत देण्यासाठी भारताचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तसेच ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. (Indian ship) बचावलेल्या खलाशांना भारतात परत आणणे आणि मृत खलाशाचे पार्थिव मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियातील सागरी मार्गांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आखातातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमुळे खलाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. भारताने व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवण्याची आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून सुरक्षित, निर्बंधमूक्त वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. (Indian ship) परदेशी समुद्रमार्गांवर कार्यरत भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्यात येत आहे. या ताज्या हल्ल्यामुळे सागरी व्यापाराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड