सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने लावलेल्या रेट्यापुढे काँग्रेसने सपशेल (anger)शरणागती पत्करली. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर करत सांगलीत ‘विशाल नाही मशाल’, असा स्पष्ट संदेश दिला. त्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये संताप उसळला असून, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. २०१९ नंतर पुन्हा एकदा काँग्रेसने दरवाजा बंद केल्याने आता विशाल पाटीलबंडाच्या पवित्र्यात आहेत. या निर्णयावर आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करून ते निर्णय घेतील, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुंबईत ११ मार्चला ठाकरे गटात प्रवेश केलेल्या चंद्रहार यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ मार्च रोजी मिरजेत येऊन शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली होती. ठाकरे यांची ही घोषणा म्हणजे महाविकास आघाडीची नव्हे, असा दावा करत काँग्रेस आक्रमक झाली होती.
आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, (anger)पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी प्रदेश आणि राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सांगली काँग्रेसलाच हवी, अशी आग्रही भूमिका घेत ठाकरेंशी चर्चा सुरू ठेवली. प्रत्येक वेळी ठाकरेंनी ती धुडकावून लावली. अखेर शिवसेनेच्या हट्टापुढे आणि रेट्यापुढे काँग्रेस नेत्यांना नमते घ्यावे लागले. सांगलीत शिवसेनेच्या तुलनेत कैक पटीने ताकद असलेल्या काँग्रेसला जागा सोडवून घेण्यात प्रदेश काँग्रेसचे नेते सपशेल अपयशी ठरले. राष्ट्रीय नेतृत्वदेखील ठाकरेंच्या दबावापुढे नमले. अखेर आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना ‘सांगली’चा उल्लेख जाणीवपूर्वक दोन वेळा केला.
आता विशाल पाटील काय करणार, याकडे जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. २०१९ मध्ये अशाच पद्धतीने काँग्रेसकडून सांगली मतदारसंघ काढून घेतला होता. त्यावेळी विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पुन्हा एकदा त्यांची परीक्षा आहे. यावेळी त्यांचे नेतृत्व विश्वजित कदम करत आहेत. ते त्यांचे ‘पायलट’ आहेत. आता विश्वजित हे विशाल यांचे विमान बंडाच्या दिशेने नेतात का, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विश्वजित यांची भूमिकाच विशाल यांची दिशा ठरवणार असल्याचे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले. त्यासाठी आज ता. १० काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात नेते पुढची दिशा ठरवतील.
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार)(anger) विश्वजित कदम आणि विशाल पाटील ‘नॉट रिचेबल’ झाले. काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेस कमिटीसमोर दाखल झाले. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आक्रमकपणे जिल्हा काँग्रेसची भूमिका मांडली. आता विशाल पाटील यांनी बंड करावे, बंद दरवाजा फोडून आत जावे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
काँग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी काँग्रेसला टोले लगावले. माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात काँग्रेसच्या पारंपरिक जागा राखण्यात नेत्यांना यश आलेले नाही. इथले नेतृत्व कमकुवत झाले आहे. सांगली काँग्रेसनेच लढायला हवी होती.’’ आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘जिंकणाऱ्या जागा काँग्रेसला सोडायच्या नाहीत, हे ठाकरे आणि पवार यांनी ठरवून केले आहे. त्यांनी काँग्रेसची गेम केली आहे.’’
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगलीची उमेदवारी शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार, याबाबतचे अचूक वृत्त आज ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. सांगलीबाबत प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंपुढे हात टेकले असून, सांगलीचा विषय संपला आहे, असे ‘सकाळ’ने सर्वात आधी व अचूक जाहीर केले. त्याची आज चर्चा होती.
हेही वाचा :
मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढणार;
संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज
अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका