8 एप्रिल रोजी आपल्या चंद्राने सूर्याला लावलेलं खग्रास (straw)सूर्यग्रहण कसा जागतिक कुतूहलाचा विषय ठरला ते गेल्या लेखात आपण पाहिले. असेच खग्रास सूर्यग्रहण आपल्या ग्रहमालेतल्या इतर कोणत्या ग्रहावरून दिसते का? किंवा इतर ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह नेमके पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध येतात तेव्हा नेमके कसे दृश्य दिसते ते आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ… पण एकूणच आपल्या ग्रहमालेमधील ही नैसर्गिक ‘चंद्र-मंडळी’ वैज्ञानिकांच्या सततच्या अभ्यासाचा आणि सामान्य निरीक्षकाच्या आनंदाचा विषय ठरली आहेत. गॅलिलीओ यांनी त्यांच्या छोटय़ा दुर्बिणीतून 1609 मध्येच पाहिलेले ‘गुरू’ ग्रहाचे गॅनिमिड, आयो, युरोपा आणि पॅलिस्टो हे त्याच्या सुमारे 100 ‘चंद्रां’पैकी महत्त्वाचे चार चंद्र आम्ही शक्तिशाली दुर्बिणीतून अनेकदा पाहिलेत. हिंदी भाषेत ‘चार चांद लगाना’ हा वाक्प्रचार आहे. गुरूच्या बाबतीत तो अक्षरशः खरा ठरलाय.
त्यातही आपला, आपल्यापासून तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावरचा, म्हणजे खगोलीय अंतरांच्या परिमाणांमध्ये अगदी परसदारी असलेला चंद्र केवळ ‘चांदोमामा’ म्हणून कवितेपुरता(straw) किंवा प्रेमगीतांमधलाच राहिलेला नाही, तर 1969 मध्ये मानवाने तो पादाक्रांत केल्यानंतर त्याची वैज्ञानिक आणि व्यावहारिक उपयुक्ततासुद्धा जाणवू लागली आहे. इलॉन मस्क यांच्यासारखे कल्पक धनाढय़, चंद्राची ‘सफर’ घडवून आणण्याच्या योजना आखत असून त्याला प्रतिसादही मिळत आहे.
त्यामुळेच, चंद्रानंतर पुढे मंगळ मोहिमा आखायच्या तर चंद्र हा एक मधला टप्पा असू शकतो. चांद्रभूमीचा उपयोग, तिथूनच काही यानं सोडण्यासाठी होऊ शकेल का, याची चाचपणी सध्या सुरू आहे. त्याचीही व्यावसायिक स्पर्धा आता जगात रंगणार याची चिन्हे दिसतायत. हिंदुस्थान, चीन यांनीही चंद्रावर माणूस उतरवण्याचा विचार गंभीरपणे सुरू केल्याने 1972 नंतर अमेरिकेने थांबवलेली चांद्रमोहीम नव्याने जोम धरत आहे.
‘अर्टेमिस’ मालिकेतल्या तिसऱया समानव यानातून अमेरिकेच्या चांद्रवीरांसोबत जपानी अंतराळयात्रीही जातील आणि अमेरिकेबाहेरील एखाद्या देशाचा चांद्रवीर चंद्रावर उतरेल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जपानी प्रधानमंत्री किशिदा यांच्यात झालेल्या चर्चेनुसार अमेरिकेबाहेरचा पहिला चांद्रवीर आणि 1969 पासूनचा तेरावा चांद्रवीर (तो किंवा ती) जपानी असेल. या वृत्तामुळे जपानची अंतराळ संशोधन संस्था तसेच जपानी जनतेलाही आनंद झालाय यात नवल नाही. सगळे काही व्यवस्थित पार पडले तर जपानी अंतराळयात्री 2026 मध्ये चंद्रावर उतरेल. त्याच्याबरोबर अमेरिकेचेही काही चांद्रवीर असतीलच, पण 1972 नंतर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा पूर्वेच्या देशातील एक जपानी आणि आपल्या आशिया खंडामधला असेल. त्यानंतर 2030 मध्ये चीन त्यांच्या चांद्रयात्रीला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत आपली ‘इस्रो’ संस्था कधी सहभागी होते ते यथावकाश समजेल. याच महिन्यात जपानी प्रधानमंत्री फुमिओ किशिदा अमेरिकेच्या दौऱयावर गेले असताना अमेरिकन अध्यक्षांनी जपानला ही खुशखबर दिली. दुसऱया महायुद्धात ज्या अमेरिकेचे अध्यक्ष टमन यांच्या आदेशाने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकले तीच अमेरिका आता प्रगत जपानचा अंतराळी सन्मान करण्यासाठी पुढे येत आहे हे उद्यमशील जपान्यांचे यश म्हणावे लागेल.
20 जुलै 1969 ते डिसेंबर 1972 या काळात अमेरिकेने 12 गोरे अंतराळवीर चंद्रावर उतरवले. त्यात एकही महिला किंवा इतर अमेरिकन नव्हते. आता अमेरिकेची भूमिका बदलताना दिसतेय. उद्या त्यांच्याच देशातले कोणी मूळचे आफ्रिकी, हिंदुस्थानीसुद्धा चांद्रवीर असू शकतील (कल्पना चावला, सुनीता विल्यम्स ही उदाहरणे आहेतच) अर्थात त्यापूर्वी आपण आपला चांद्रवीर चंद्रावर पाठवू शकलो तर त्यासारखे अपूर्व यश कोणते!
जपानच्या ‘जेक्सा’ या अंतराळ संशोधन संस्थेने संभाव्य जपानी चांद्रवीराच्या घोषणेचे स्वागत करून संतोष व्यक्त केला यात आश्चर्य ते काय? तसेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील स्पेस प्रोग्रॅमध्ये जपानच्या ‘जेक्सा’चा पूर्वीपासूनच सहभाग आहे. जेक्साबरोबरच युरोपीय स्पेस एजन्सीसुद्धा अमेरिकेच्या ‘अर्टेमिस’ प्रकल्पात सहभागी आहे. या मालिकेतले अर्टेमिस-2 यान 2024 मध्ये आणि जपानी चांद्रवीरासह ‘अर्टेमिस-3’ हे यान 2026 मध्ये चंद्रावर जाईल.
चंद्र आपल्यापासून अंतराळी अंतराच्या दृष्टीने दूर नसला तरी तीन लाख 84 हजार किंवा ते पृथ्वीजवळच्या कक्षेत असताना किमान तीन लाख 56 हजार किलोमीटरचा यान प्रवास खूप खर्चिक असतो. म्हणूनच आपण जास्त दिवसांत, पण कमी खर्चात तीन चांद्रयाने पाठवली. ती अनेक महिन्यांचा प्रवास करून तिथे पोहोचली. अमेरिकेची याने प्रचंड इंधन खर्च करून अवघ्या तीन दिवसांत चंद्रावर जातात. म्हणूनच जपानला त्याचे महत्त्व वाटतेय. शिवाय त्यांच्या ‘स्लीम’ चांद्रयानाने, चंद्रावरच्या अतिशीत अशा 14 दिवसांच्या रात्रीनंतरही जागे होण्याचा जागतिक विक्रम केलाच आहे. तेव्हा त्यांचे तंत्रज्ञान अमेरिकेलाही उपयुक्त ठरणारच.
हेही वाचा :
झवेरी बाजारातील सोने तस्करीचा डीआरआयने केला पर्दाफाश
पंतचा गुजरातला तडाखा! होमग्राउंडवर 4 धावांनी विजय
बर्फाने केले डोके गरम; अस्वच्छतेमुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी वाढली