‘नीव’बरोबरचा नवा जन्म

आई होण्यासाठी मी उपचार घेत होते. त्यामुळे मी आई होणार ही बातमी माझ्यासाठी अचानक समोर आलेली बातमी (news)नव्हती.

  • अर्चना नेवरेकर

आई होण्यासाठी मी उपचार घेत होते. त्यामुळे मी आई होणार ही बातमी (news)माझ्यासाठी अचानक समोर आलेली बातमी नव्हती. आईपणासाठी मी स्वत:चं मन तयार ठेवलं होतं. आई होण्याचा मला आनंद तर होताच; पण त्याचबरोबर माझ्या उपचारांबाबत थोडी चिंताही होती. खरं तर या चिंतेमुळे माझ्या भावना थोड्या झाकोळल्या गेल्या होत्या; पण आई होण्याच्या सुखद भावनांपुढे ही चिंता विरून गेली.

आई झाल्यावर शारीरिक, मानसिक बदल तर झालेच, शिवाय काम करतानाचा प्राधान्यक्रम बदलला. खरं तर हे सगळ्या महिलांसाठी नवीन असतं. त्या काळातील जगच नवीन वाटतं. आई होताना बाळाबरोबरच माझाही जन्म नवीन होता. कारण नीवमुळे मला आईपणाचा जन्म मिळाला.

माझं आयुष्य त्याच्याभोवती घुटमळत होतंच, शिवाय मी स्वत:देखील तितकाच वेळ देत होते. अनेक वेळा असं होतं, की मुलाचा विचार करताकरता आई स्वत:कडे दुर्लक्ष करत असते. मी तसं न होऊ देता मुलाबरोबरच स्वत:कडेही तितकंच लक्ष देत होतं.
आई झाल्यानंतरही माझं काम कधीच थांबलं नाही. ॲवॉर्ड्‌स, पिक्चर अशी कामं सुरूच होती. या सगळ्यामध्ये माझ्या छोट्या मुलाची कुठेही वणवण होऊ नये म्हणून माझी आई, बहीण सतत माझ्याबरोबर होत्या. त्यामुळे त्याला सांभाळणं मला फारसं कठीण गेलं नाही. अशा वेळेस एकत्र कुटुंबपद्धती खूप महत्त्वाची वाटते.

कामानिमित्त बाहेर असताना अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत, जिथं पालक मुलांना एकट्यानं सांभाळत होते; पण मला नीवला सांभाळताना कोणतीच अडचण आली नाही, कारण माझ्या घरातील सर्वजण त्याला सांभाळण्यासाठी सदैव तत्पर होते.

त्यामुळे मी कितीही कामात असले तरी माझ्या मनाला शांती होती, की तो सुरक्षित आहे. अनेक मातांना आपल्या बाळासाठी ‘बेबी सीटिंग’ची व्यवस्था करावी लागते. अशा वेळेस त्यांची परिस्थिती काय होत असेल? तसा अनुभव माझा नव्हता. त्यामुळे घरात ज्येष्ठ असणं खूप महत्त्वाचं असतं. हा अनुभव आई होताना प्रत्येक महिलेला येत असतो.

खूप वर्षांनी मला बाळ झाल्यानं त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यांचा मी आनंद घ्यायचा ठरवलं होतं. नीव फारसा रडवा नव्हता. तो समंजस आहे. अभ्यासातही तो हुषार आहे. मला जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचं असतं, तेव्हा माझ्या घरातील कोणी ना कोणी त्याला पाहण्यासाठी असतं. त्याचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी वेगवेगळं ‘बाँडिंग’ आहे.

त्यामुळे आपली परंपरा, संस्कार त्याला कुटुंबातूनच मिळत असल्यानं मी निश्‍चिंत आहे. सोशल मीडियामुळे मी कायम त्याच्या जवळ असते. कधी आठवण आली, तर व्हिडिओ कॉल करून तो मला पाहू शकतो, बोलू शकतो.

हेही वाचा :

महिला बचत गटांना महापालिकेतर्फे अर्थसाहाय्य

IPL प्लेऑफचे तिकीट कोणाला मिळणार?

आताची मोठी बातमी,स्टेजवरच नितीन गडकरींना भोवळ