सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

कोल्हापूर : आघाडीचे(political party) जागा वाटप करताना ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना उमेदवारीची संधी द्यायची असे ठरले होते. इतक्याच जागा पाहिजेत असा हट्ट केला नाही. कोल्हापूरच्या जागेसाठी जनता मागे असल्याने शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केला; पण सांगलीची एकमेव जागा आहे की, त्याची चर्चा झाली नाही. थेट टीव्हीवर पाहिल्यानंतर समजले, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

इंडिया आघाडी(political party) पाच वर्षांत पाच पंतप्रधान करणार इतके खोटे, अवास्तव बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही. पंतप्रधानपदाची कधी झाली नव्हती इतकी सर्वाधिक अप्रतिष्ठा नरेंद्र मोदी यांच्याकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करू. सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच त्यांच्याकडून हा अपप्रचार सुरू असल्याचेही पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘मतदानाची टक्केवारी कमी होण्यासाठी लोकांची उदासीनता, नाराजीबरोबरच कडक उन्हाळाही कारणीभूत आहे. पाच वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. शेतकरी नाराज आहेत. तरुणांमधील उत्साह कमी आहे. त्याचीच चिंता राज्यकर्त्यांना भेडसावत असल्याने तमिळनाडू, मध्य प्रदेश अशा राज्यांत एकच टप्पा असताना महाराष्ट्रात पाच टप्पे केले. जास्तीत जास्त मतदारसंघांत पंतप्रधान जावेत याची काळजी घेतली आहे.’

‘पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अजून सांगितलेली नाही. दोन दिवसांनी केवळ टक्केवारी जाहीर केली. त्यातही वाढ झाली. हा प्रकार काळजी करण्यासारखा आहे. त्याची माहिती घ्यावी लागणार आहे. नागपूर, चंद्रपूरपेक्षा गडचिरोलीला जादा मतदान झाले आहे, हे शंकास्पद आहे. सध्या मोदी आघाडी पुढे असल्याचे पंतप्रधान धडधडीत खोटे सांगतात. इंडिया आघाडी पाच वर्षांत पाच पंतप्रधान करणार हा जावईशोध कुणी लावला? त्यांच्याच डोक्यातून ते निघाले असून, इंडिया आघाडीच्या बैठकीत त्याची चर्चाही झालेली नाही. बहुमत मिळाल्यानंतर पाच वर्षे एक पंतप्रधान व स्थिर सरकार दिले जाईल. निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेतला जाईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेल्या तीन-चार वाक्यांनी भाषणाची सुरुवात करायची ही त्यांची स्टाईल आहे. लोकांचे समाधान करण्याचे विषय नसल्याने मूळ विषयांना बगल देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यातूनच भटकंती आत्मासारखे वक्तव्य करून पंतप्रधानपदाची ते अप्रतिष्ठा करत आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो. त्याला जात, धर्म, प्रांत याचा विचार करून चालत नाही. दक्षिणेकडील राज्यात प्रतिसाद मिळाला नाही. विरोध होत आहे. त्यामुळे दक्षिण भारत हा वेगळा देश करण्याबाबतची चर्चा ते घडवून आणत आहेत. लोक हे मान्य करणार नाहीत.

झारखंड, पश्‍चिम बंगाल, हरियाणा, दिल्लीतील मंत्र्यांबाबत जी स्थिती आहे तीच सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत होत आहे. त्रास देणे, खोट्या केस दाखल करणे हे काम सुरू असून, सत्तेच्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण आहे. राज्यकर्ते कोणत्या टोकाला जात आहेत हे दिसते. धनंजय मुंडे करत असलेल्या वक्तव्यातून त्यांचे चारित्र्य स्पष्ट होत आहे. गादीला मान पण मत कष्टकऱ्याला, अशी घोषणा येथे करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या येथील उमेदवाराने मोदींसोबत जाणार नाही हे जाहीर करावे.’

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला केवळ ६, तर भाजप-सेना युतीला ४२ जागा मिळाल्या; पण यावेळी तशी परिस्थिती राज्यात दिसत नाही. कारण, शेतकरी सरकारच्या योजनांबद्दल नाराज आहेत आणि गेल्या दोन निवडणुकांत मोदी मोदी म्हणणाऱ्या तरुणांतील उत्साह कमी झाला आहे.

हेही वाचा :

 मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्..

मोदींचाच आत्मा वखवखलेला; शरद पवारांवरील पंतप्रधानांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार