महाराष्ट्रात कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारने 28 कोटी रुपये खर्चून कृष्णा नदीवर खिद्रापूर गावाच्या सीमेपर्यंत (bridge)पूल बांधले आहे. मात्र, पुलाची महाराष्ट्राच्या बाजूची उतरंड ( रॅम्प किंवा पोहोच रस्ता) बांधण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांची शेती अधिग्रहीत करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे गेली दोन वर्ष पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी खिद्रापूर आणि त्याच्या अवतीभवतीच्या महाराष्ट्रातील गावांमधील नागरिक कर्नाटकात ये जा करू शकत नाही.
फक्त 80 लाख रुपये खर्चून महाराष्ट्र सरकारला काही गुंठे जागा अधिग्रहीत करून कर्नाटकाला पुलाच्या(bridge) उर्वरित बांधकामासाठी (महाराष्ट्राच्या बाजूने उतरंड बनविण्यासाठी) द्यायची आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राच्या बाजूने अक्षम्य प्रशासनिक दिरंगाई होत असल्याने पुलाचा बांधकाम रखडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
कर्नाटक सरकार 28 कोटी रुपये खर्च करून पूल महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पूल बांधू शकते. मात्र, त्या पुलाच्या उतरंडसाठी महाराष्ट्र सरकार 80 लाख रुपये खर्च करून आवश्यक जागा देऊ शकत नसेल, तर आम्ही मतदान का करावं असा प्रश्न खिद्रापूर मधील तरुणांनी उपस्थित केला आहे.
जर सरकारला आमच्या दळणवळणाची, पुराच्या काळातील सुरक्षिततेची काळजी नसेल, तर आम्हीही मतदान करणार नाही असा निर्धार गावातील अनेक मतदारांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कृष्णा नदीत दरवर्षी येणाऱ्या पुराच्या काळात परिसरातील उंच भागाकडे सुरक्षित जाण्यासाठीही हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, तरीही अवघ्या 80 लाख रुपयांच्या महाराष्ट्राच्या बाजूच्या खर्चामुळे पूल अर्धवट स्थितीत असल्याने महाराष्ट्रातील मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हेही वाचा :
कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली Video
कोल्हापुरातील ‘या’ दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस; निवडणुकीचा खर्च अमान्य
जोतिबाचे दर्शन घेऊन आलेल्या तरुणाचा कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडून मृत्यू….