कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जनमानसावर फार मोठा प्रभाव टाकणारे नेते म्हणून छगन भुजबळ(meeting) यांची ओळख नाही. तथापि राज्यातील ओबीसी समाज हा आपले नेतृत्व मानतो असे सामाजिक आणि राजकीय वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. आणि त्यासाठी समता परिषदेचे माध्यम ते आत्तापर्यंत वापरत आले आहेत. शरद पवार यांनी त्यांना ओबीसींचा चेहरा म्हणूनच महत्त्व दिले होते. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून दोन अडीच वर्षे तुरुंगात राहिलेल्या भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन नाही त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून केले होते. त्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर बंद खोलीत चर्चा केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.
रविवारी यादीत दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या(meeting) कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वर त्यांचे नाव न घेता जहाल टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात बैठक आयोजित केली होती. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बैठकीचे निमंत्रण दिले होते पण बारामती मधून संबंधितांना फोन केले आणि बैठकीस उपस्थित राहू नका असे सांगितले गेले असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला होता आणि तो शरद पवार यांनाच उद्देशून होता. त्याबद्दल पवार गटातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.त्याबद्दलचा खुलासा करण्यासाठी किंवा सारवासारव करण्यासाठी त्यांनी सिल्वर ओक येथे जाऊन शरद पवार यांची सोमवारी भेट घेतली.
सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेल्या छगन भुजबळ यांना शरद पवारांनी तब्बल दीड तास वेटिंग वर म्हणजे ताटकळत ठेवले होते. अजितदादांच्या बरोबर गेलेल्या छगन भुजबळांनी पहिल्यांदाच स्वतंत्रपणे आणि अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने सोमवारची ती ब्रेकिंग न्यूज ठरली. या अचानकच्या भेटीबद्दल शरद पवार यांच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही किंवा या भेटीत काय चर्चा झाली याचे तपशील सांगितले गेले नाहीत मात्र या भेटीबद्दल फारच मोठा राजकीय धुरळा उडाल्यानंतर छगन भुजबळ यांनीच पत्रकारांशी संवाद साधला.
आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या महाराष्ट्रात सामाजिक वातावरण गढूळ झालेले आहे. मराठ्यांच्या दुकानात ओबीसी जात नाहीत आणि ओबीसींच्या दुकानात मराठे जात नाहीत. इतके असामाजिक वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधी निर्माण झालेले नव्हते.
आता या प्रश्नावर आपणच पुढाकार घ्यावा असे सांगण्यासाठी मी शरद पवार यांची भेट घेतली होती असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे. मला आमदारकीची, मंत्री पदाची, राजकारणाची कोणतीही पर्वा नाही. पण महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चांगले राहिले पाहिजे हे माझे मत आहे आणि त्यासाठी मी शरद पवार यांची भेट घेतलेली आहेच, प्रसंगी मी राहुल गांधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेईन असेही भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून छगन भुजबळ हे मराठा आरक्षण या विषयावर मंत्री म्हणून नव्हे तर ओबीसी समाजाचे नेते म्हणूनच व्यक्त झालेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, त्यांना कुणबी म्हणून दाखले देता कामा नयेत अशी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे. त्यातूनच महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून “जात कलह” पुढे आला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण गढूळ करण्यात भुजबळ यांचा काहीही संबंध नाही असे कोणीही म्हणणार नाही. तथापि टाळी एका हाताने वाजते असेही नाही.
छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते अजित दादा यांना सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण तसे घडण्याची शक्यता सुतराम नाही. भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर शरद पवार यांनी पहिली जाहीर सभा नाशिकच्या येवला विधानसभा मतदारसंघात घेतली होती आणि त्या सभेत छगन भुजबळ यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात माझी चूक झाली. त्यासाठी मला माफ करा असे आवाहन शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी किती ठिकाणी माफी मागण्यासाठी जाणार? असा सवाल केला होता. इतके टोकाचे वातावरण तयार झाल्यामुळे त्यांना पुन्हा शरद पवार हे आपल्या पंखाखाली घेतील असे संभवत नाही.
छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये घुसमट होते आहे, त्यांची हेळसांड होते आहे असे स्पष्ट त्यांना पुन्हा पवार गटात घ्यायचे किंवा नाही याबद्दलचा निर्णय संघटनेच्या पातळीवरून घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये कोणताही निर्णय शरद पवार घेतात आणि नंतर तो सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करून घेतला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भुजबळ यांच्या विषयीचा निर्णय पवारच घेऊ शकतात.
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात जात कलह पुढे आला असला तरी दोन्ही समाजाकडून बहिष्कारचे अस्त्र वापरले गेलेले नाही. मराठे हे ओबीसींच्या दुकानात आणि ओबीसी हे मराठ्यांच्या दुकानात खरेदीसाठी जात नाहीत असे चित्र रंगवले जात असले तरी ते खरे नाही. इतक्या खालच्या स्तरापर्यंत आरक्षण आंदोलन गेलेले नाही. आणि जाणारही नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! चॉकलेटनंतर तुळजाभवानी देवीला विलायची अन् लवंगाचा हार; भाविकांमध्ये संताप
कमी करण्यासोबतच बद्धकोष्ठतेला दूर करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल रामबाण!
डोंबिवलीच्या भाजीविक्रेत्या आईचा लेक सीए झाला, प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल