राहुल गांधी यांनी ठरवले परभणी पोलिसांना जात वादी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणत्याही गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीशी, त्याची जात पाहून किंवा तुझी जात कोणती अशी विचारणा करून पोलिसांकडून व्यवहार केला जात नाही. किंबहुना संशयिताची जात हा तपासाचा विषय बनू शकत नाही. बनत नाही. पण एखादे गंभीर प्रकरण गाजू लागल्यानंतर त्यात जात शोधून राजकारण(political news) केले जाते.

परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी याची तो दलित आहे म्हणून पोलिसांनी हत्या केली असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे बोलताना केला. त्यांचा हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे यात शंका नाही. तथापि आपण केलेल्या आरोपामुळे संपूर्ण पोलीस दलाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते याचा विचार त्यांच्याकडून झाला नाही याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

भारतीय संविधान या विषयावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर(political news) यांना चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवून केलेल्या वक्तव्यावरून इंडिया आघाडीचे खासदार बिथरले. त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. त्यातच दिनांक दहा डिसेंबर रोजी एका मनोरुग्न तरुणाने संविधानाची विटंबना केल्याने परभणी शहरात दंगल उसळली, जाळपोळ झाली.

निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला जमाव हा आंबेडकरवादी होता. तो दलित होता. त्यामुळे पोलिसांनी दंगलखोरांना ताब्यात घेतले त्यात बहुतांशी दलितच असणे हे स्वाभाविक होते. सोमनाथ सूर्यवंशी हा तरुणही त्यात होता. पोलिसांच्या कायदेशीर रखवालीत असताना सोमनाथ मरण पावला. अशावेळी पोलीस गांगरून जातात, घाबरून जातात, आणि मग आपल्यावर काही बालंट येऊ नये म्हणून ते प्रयत्न करतात. आम्ही त्यांना अटक केली आणि तो मरण पावला हा योगायोग आहे. आम्ही केलेल्या मारहाणीत तो मयत झाला नाही असा युक्तिवाद पोलिसांकडून हमखास केला जातो. याही प्रकरणात पोलिसांनी तसाच आपला बचाव केलेला आहे.

पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा खूनच असल्याचे समजून त्याची राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीआयडी) त्याची चौकशी केली जाते, तपास केला जातो. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची ही अशीच चौकशी होईल. वैद्यकीय पुरावे किंवा उत्तरीय तपासणी (शवविच्छेदन) अहवाल यावर अशा प्रकारच्या तपासाची मदार असते. सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूची नजीकच्या काळात अशाच प्रकारे चौकशी होईल पण सोमनाथ हा दलित होता आणि म्हणून पोलिसांनी त्याची हत्या केली असा आरोप करणे म्हणजे संपूर्ण पोलीस दलास आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यातला प्रकार आहे, असे म्हणता येईल.

एखाद्या घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करते. या आंदोलनात काही समाजकंटकही असतात. त्यांना दंगल हवी असते. ते दंगल घडवून आणतात आणि मग निष्पाप निदर्शक पोलिसांच्या कडून पकडले जातात. परभणी मध्ये असाच काहीसा प्रकार घडला आणि निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला आणि काही निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि काही तासातच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सोमनाथ हा मरण पावला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो चांगला होता, प्रकृती चांगली होती तर मग अचानक याचा मृत्यू कसा होतो याबद्दल नातेवाईकांना संशय येणे स्वाभाविक आहे. म्हणून त्यांनी पोलिसांनीच सोमनाथची हत्या केली असल्याचा आरोप केलेला आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मरण आलेले नाही तर त्याला अस्थम्याचा विकार होता त्यामुळे तो मरण पावला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री(political news) या नात्याने विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली.

सोमनाथ च्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या तसे वैद्यकीय अहवाल सांगतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. त्याबद्दल त्यांच्यावर आता आम्ही हक्कभंगाचा ठराव मांडू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या खास पथकाकडून या प्रकरणाचा तपास होईल. सबळ पुरावे आढळले तर पोलिसांवर गुन्हा दाखल केला जाईल.

तथापि अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास हा सखोल केला जातो. म्हणूनच काही महिन्यानंतर या प्रकरणातील वास्तव सर्वसामान्य जनतेच्या समोर येईल. सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसांच्या रीतसर कस्टडीत असताना मरण पावलेला आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू संशयास्पद आहे. म्हणून काही तो दलित होता म्हणून पोलिसांनी त्याला मारले असा निष्कर्ष काढणे किंवा आरोप करणे हे पोलीस प्रशासनासाठी न्यायाचे ठरणार नाही. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातही ठेवता येणार नाही.

हेही वाचा :

“महेंद्रसिंग धोनीच्या घरावर राज्य सरकारचा हक्क? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण”

यंदाच्या वर्षी सोन्याला मिळाले चमकदार भाव, 2025 पर्यंत राहील का चमक?

लाडक्या बहि‍णींसाठी वर्षाचा शेवट गोड, आजपासून १५०० रूपये खात्यात जमा होणार