कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : तब्बल 22 दिवसानंतर वाल्मीक कराड हा राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाला शरण आला, पण त्याच्या विरुद्ध पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या(murder) प्रकरणी त्याच्यावर सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल केला जाणार आहे काय? महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे काय?
दहशतीच्या जोरावर त्याने मिळवलेली अफाट संपत्ती जप्त केली जाणार आहे काय? ज्यांच्या नावावर ही संपत्ती किंवा स्थावर मालमत्ता आहे त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे काय? तो शरण आला आहे याचा अर्थ तपास यंत्रणा कुठेतरी कमी पडली आहे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणि या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील या गावचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची अगदी किरकोळ कारणावरून अतिशय निर्दयपणे हत्या(murder) करण्यात आली आणि हत्या करणारे सर्व संशयित आरोपी हे वाल्मीक कराड याचे साथीदार आहेत आणि वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे. आणि म्हणूनच या हत्या प्रकरणाचे गांभीर्य वाढले.
धनंजय मुंडे हे त्याच्या मागे ठामपणे उभे असल्यामुळेच त्याला पोलिसांकडून अभय मिळत गेले. म्हणून मग धनंजय मुंडे यांना मंत्रि पदापासून दूर ठेवा या मागणीने जोर धरला. आणि आता कराड याला अटक केली असली तरी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून जोपर्यंत हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलनाची धार वाढत जाईल. मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचे किंवा नाही याचा निर्णय महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा पवार यांनी घ्यावयाचा आहे. आणि ते या प्रकरणात फारसे बोलावयास तयार नाहीत.
धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात असतील तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निपक्षपातीपणाने तपास होणार नाही. अशी भीती सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांना आंदोलनाची धार वाढवत न्यावी लागणार आहे. वाल्मीक कराड हा माझा मित्र आहे अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अप्रत्यक्षपणे अडचणीत आले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हाच आहे, त्याचे गॉड फादर धनंजय मुंडे आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. म्हणूनच तपास योग्य रीतीने व्हावयाचा असेल तर काही काळ तरी मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले पाहिजे आणि त्यासाठी गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना तसा निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजे. सोमवारी सायंकाळी धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटावयास गेले.
या दोघात काय चर्चा झाली हे कळावयास मार्ग नाही मात्र वाल्मीक कराड याच विषयावर त्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. कारण या दोघांची भेट झाल्यानंतर वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे आणि तो नक्कीच योगायोग नाही.
वाल्मीक कराड यांने माझा संतोष देशमुख हत्या(murder) प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगितले असले तरी, कोणताच गुन्हेगार आपण गुन्हा केल्याची कबुली देत नाही हे लक्षात घेऊन तपास अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली किंवा अभिप्रेत असलेली कारवाई केली पाहिजे तरच पोलिस हे जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील. अन्यथा धनदांडग्या असलेल्या संशयित आरोपींना तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून वेगळा न्याय दिला जातो हा समज अधिक दृढ होण्यास मदत होईल.
बीड पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे, विष्णू चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या चौघांना अटक केली आहे आणि सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या तिघांना फरार म्हणून घोषित केले आहे. तथापि दाखल झालेल्या गुन्ह्यात वाल्मीक कराड याचे नाव स्टेशन डायरीमध्ये नोंदवले गेले आहे काय? तसे नसेल तर मग सुधारित फिर्यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करावे लागेल आणि मग देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक केली जाईल.
तूर्तास तरी त्याला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असताना वाल्मीक कराड याचे नाव निष्पन्न झाले, तसे प्रथम दर्शनी पुरावे आढळले म्हणून आम्ही त्याला अटक करत आहोत असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले तरच सर्वसामान्य जनतेचा तपास यंत्रणेवर विश्वास बसणार आहे.
संतोष देशमुख यांची हत्या(murder) कट करून केली असल्याचे कलम सुरुवातीलाच लावले गेले असेल तर या कटाचा सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याला रीतसर अटक करण्यात पोलिसांना कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मी स्वतः गांभीर्याने लक्ष घातलेले आहे, सरकार कोणालाही सोडणार नाही किंवा आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही अशी कठोर भूमिका जाहीर करूनही पोलिसांना वाल्मीक कराड याला अटक का करता आली नाही? तो शरण येण्याची वाट का पाहावी लागली? असे काही प्रश्न सामान्य जनतेला पडलेले आहेत आणि त्याचे समाधानकारक उत्तर देण्याचे बंधन महायुती सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.
वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध 14 गुन्हे दाखल आहेत. ते सर्व गंभीर स्वरूपाचे आहेत आणि तरीही त्याला पोलिसांनी दोन सुरक्षा रक्षक दिले होते. गुन्हेगाराच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांना का घ्यावी लागली? विशेष म्हणजे वाल्मीक कराड हा धनदांडगा आहे आणि तो गुन्हेगार आहे, महा गुंड आहे ही वस्तुस्थिती असताना त्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश कोणी दिले होते याचीही आता चौकशी झाली पाहिजे.
विशेष म्हणजे तो 22 दिवस फरार होता आणि त्याच्यासोबत शासनाने पुरलेले सुरक्षा रक्षक होते. त्याच्या कुटुंबीयांची तसेच त्याच्या दोन पत्नींची पोलिसांनी चौकशी सुरू केली होती, त्यांना दिवस दिवसभर पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते, इतर नातेवाईकांची चौकशी सुरू होती, मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती, हे सर्व टाळण्यासाठी वाल्मीक कराड याला पोलिसांना शरण जाण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नव्हता. आता तो गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात आहे. त्यांच्या तपासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. आणि त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झाली पाहिजे अशी सामान्य जनतेची भावना आहे.
संतोष देशमुख हत्या(murder) प्रकरणात संशयित आरोपी कितीही मोठा असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही असे आश्वासन गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले आहे. या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून अपेक्षित आहे. एकूणच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले तरच देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार हे लोकांना न्याय देणारे आहे असा संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे.
हेही वाचा :
तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
जानेवारी महिन्यात या दिवसांपासून लागत आहे पंचक, यावेळी करु नका कोणतेही शुभ कार्य