कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : म्हटल्या तर व्यक्तिगत आणि म्हटल्या तर राजकीय अशा दोन घटनांनी रविवारी दिवसभर चर्चेचा धुरळा उडाला होता. एका घटनेला राजकीय आणि दुसऱ्या घटनेला राजकीय भांडवल असे स्वरूप होते.” कहि खुशी कहि गम” असा एकूण माहोल होता. एक घटना पुण्यातील खराडी या उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागातील आणि दुसरी घटना मुंबईच्या कलानगर अर्थात “मातोश्री” परिसरातील. दोन्ही घटना मातब्बर राजकारण्यांशी संबंधित. दोन्ही घटनांकडे पाहण्याचा अँगल मात्र वेगवेगळा. कारण एक होता “धाड(Raid)” दिवस आणि एक होता वाढदिवस.

शनिवार ते रविवारच्या मध्यरात्री पुणे पोलिसांच्या एका विशेष पथकाने खराडी या उच्चभ्रूणच्या वस्ती असलेल्या एका तारांकित हॉटेलवर धाड टाकली. तिथे हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टीत धनिकांचा सहभाग असतो. कारण तेथे महागड्या अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. रेव्ह पार्टी हा तसा काही नवा प्रकार नाही. अशा पार्टीज कधी फार्म हाऊस वर तर कधी आलिशान हॉटेलवर होत असतात. प्रत्येक पार्टीवर पोलिसांची धाड(Raid) पडतेच असे नाही. आणि धाड पडली आणि त्यात कोणी सेलिब्रेटीज नसतील तर ती सर्वसाधारण बातमी ठरते. पण कोणी महत्त्वाची व्यक्ती त्यात असतील तर मीडियाला दिवसभर चघळण्यासाठी खाद्य मिळते आणि मग ते स्वतः कडचा मसाला वापरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते.
खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि आमदार रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह दोन तरुणी आणि तीन पुरुष सापडले. त्यामुळेच रविवारी खळबळ उडाली. हॉटेलच्या रूम नंबर 101 आणि 102 या दोन रूम्सचे बुकिंग प्रांजल खेवलकर यांनी केले होते. पैसे भरण्याच्या पावत्या त्यांच्या नावावर होत्या. याचा अर्थ रेव्ह पार्टीचे आयोजन त्यांनीच केले होते असा होतो. या पार्टीत प्रतिबंधित ड्रग्ज वापरले होते. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. नार्कोटिक्स ऍक्ट खाली आता गुन्हा दाखल होईल आणि तो जामीन पात्र असल्याने यातील सर्व संशयित आरोपींना तातडीने जामीन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
या रेव्ह पार्टी प्रकरणाचे राजकीय भांडवल केले जाऊ लागले आहे. संजय राऊत, सुषमा अंधारे, रोहित पवार यांनी खडसे कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी केलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी संपूर्ण भारतीय जनता पक्ष हाच रेव्ह पार्टी असल्याचे म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. जावई दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे पण मुद्दाम गुंतवण्याचा प्रकार असेल तर खपवून घेणार नाही असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
कोणताही हेतू समोर न ठेवता पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे आणि त्यात प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती सापडणे हा योगायोग आहे. प्रांजल हे सापडले नसते तर ही रेव्ह पार्टी साधारण होती असे समजून मीडियाने तिची दखल घेतली नसती. गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांच्या प्रतिक्रिया सुद्धा राजकीय आहेत. दरेकर यांनी तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसे यांनी राजीनामा देण्याची केलेली मागणी केवळ हास्यास्पद म्हटली पाहिजे. जणू काही त्यांनी प्रांजल खेवलकर यांना अशा प्रकारची पार्टी आयोजित करण्यास सांगितले होते. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वादाची या रेव्ह पार्टीला फोडणी देण्याचा प्रयत्न काही जणांच्याकडून केला जातो आहे. तर असा हा पुण्यामध्ये रविवारी गाजलेला”धाड(Raid)”दिवस होय!

मुंबईतील कलानगर मधील मातोश्री परिसरात उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस दणक्यात साजरा होताना दिसला. शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात अचानक राज ठाकरे हे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री वर येत आहेत म्हटल्यावर शिवसैनिकांमध्ये तसेच मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात हे ठाकरे बंधू एकत्र येण्याचे हे संकेत मानले जातात. गेल्या 18 वर्षातील ठाकरे बंधूंची ही तिसरी गळाभेट आहे.
अगदी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्यांना दवाखान्यातून मातोश्री पर्यंत घेऊन जाणाऱ्या कारचे सारथ्य राज ठाकरे यांनी केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर ठाकरे बंधूंची झालेली ही पहिली भेट होती. त्यानंतर हिंदी भाषा सक्ती मागे घेतल्याचे निमित्त साधून वरळी डोम येथे झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू दुसऱ्यांदा एकत्र आले होते. पण त्याला राजकीय पार्श्वभूमी नव्हती.

त्यानंतर रविवारी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. तेथे झालेली ही तिसरी भेट आहे. या तिन्ही भेटींना राजकीय झालं नव्हती. मात्र महिन्याभरात दोन वेळा ठाकरे बंधू एकत्र येतात याचा अर्थ नजीकच्या काळात त्यांच्यात राजकीय युती होण्याची दाट शक्यता दिसते. ठाकरे बंधूंच्या आजच्या अचानकच्या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे आणि ती आणखी काही दिवस चालेल असे दिसते.
हेही वाचा :
खुशखबर! सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा घसरण!
लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ; 26.34 लाख अपात्र लाभार्थी, जुलैचे पैसे मिळणार का?
गौप्यस्फोट! ‘दोनशे दिवसांमध्ये 2 वेळा मरता मरता वाचलो’; धनंजय मुंडे असं का म्हणाले?