पाणी संकट टँकर सेवा बंद होण्याची शक्यता, नागरिकांना पाणीटंचाईचा फटका

मुंबईत पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या (CGWA) नव्या नियमांच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकर चालक आणि मालकांनी बेमुदत संप पुकारल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी मध्यरात्रीपासून टँकर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने (Water) अनेक गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या, व्यावसायिक आस्थापने आणि बांधकाम प्रकल्पांसमोर पाण्याचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.

टँकर व्यावसायिकांचा दावा आहे की, केंद्रीय भूजल प्राधिकरणाने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे विहीर मालक, पाणीपुरवठादार आणि टँकर चालकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भूजल उपसा, परवानग्या आणि विविध प्रशासकीय अटी प्रत्यक्षात पूर्ण करणे कठीण असल्याने व्यवसाय धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.टँकर संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून, (Water) त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत कोणताही खासगी टँकर रस्त्यावर उतरवला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई थांबविणे, विहीर मालकांवरील नोटिसांचा पुनर्विचार करणे आणि वीज जोडण्या तोडण्याची मोहीम स्थगित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा मर्यादित असल्याची माहिती समोर येत आहे. आधीच महापालिकेकडून पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असताना टँकर सेवा बंद पडल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. मुंबईतील हजारो गृहनिर्माण सोसायट्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉटेल्स, उद्योग आणि व्यावसायिक संकुलांनाही या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.(Water) आता राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि टँकर संघटनांमध्ये होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले असून, या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

हेही वाचा :

रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’

पहिल्याच पावसात महामार्गावरील सेवा रस्ते जलमय

शहराला १२ जूनपासून ५० एमएलडी वाढीव पाणी