ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन?

राज ठाकरे यांचा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; खासदार फोडाफोडीवरून अमित शाहांवर गंभीर आरोप मुंबईतील मनसे मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका करत भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याचा स्वाभिमान धोक्यात आल्याचा आरोप करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही गंभीर आरोप केले. (Maharashtra) राज ठाकरे म्हणाले की, राज्य आणि देशासमोर बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी संकट आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारखे गंभीर प्रश्न उभे आहेत. मात्र, या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणात गुंतले आहेत. मतदार तासन्तास रांगेत उभे राहून मतदान करतात, पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी पैशांच्या जोरावर पक्षांतर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी दावा केला की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना काही खासदार भाजपऐवजी शिंदे गटाकडे का गेले, हा प्रश्न उपस्थित होतो. (Maharashtra) यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची तयारी सुरू असल्याचे संकेत देत त्यांनी अमित शाह २०२९ च्या राजकारणासाठी स्वतःची रणनीती आखत असल्याचा दावा केला. भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सध्या सर्व काही सुरळीत दिसत असले तरी आगामी काळात मोठे राजकीय बदल घडू शकतात, असेही ते म्हणाले. मतदार यादीतील कथित गैरप्रकार, निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नचिन्हे आणि सत्तेसाठी सुरू असलेले राजकारण यावरही त्यांनी भाष्य केले. सत्तेवर कोण बसते यापेक्षा सत्तेवर बसल्यानंतर जनतेसाठी काय काम केले जाते, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी राज्यातील वीज वितरण व्यवस्था, खासगीकरणाचे प्रयत्न, जंगल-जमिनींचे प्रश्न आणि विविध योजनांवरही टीका केली. “फुकटच्या योजनांनी देश चालत नाही, जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत (Maharashtra) त्यांनी लाडकी बहीण योजनेसह विविध लोककल्याणकारी योजनांवर प्रश्न उपस्थित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीतील त्रुटींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जागरूक राहण्याची गरज असून पुढील काही वर्षांत राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?