‘नीट-यूजी’ परीक्षेतील (neet exam)कथित अनियमिततांची चौकशी करणाऱ्या, बिहार सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओयू) शनिवारी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. ‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट संकेत आपल्या चौकशीतून मिळाल्याचे या अहवालात नमूद केले असल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार या सहा पानी अहवालात जप्त करण्यात आलेल्या कथित प्रश्नपत्रिकेचे अवशेष, आरोपींची चौकशी व कबुलीजबाब आणि परीक्षार्थींची चौकशी यांचा संदर्भ देण्यात आला आहे. ‘नीट-यूजी’ची ५ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर ‘ईओयू’ने चार परीक्षार्थींसह १३ जणांना अटक केली होती. केंद्र सरकारने ‘ईओयू’ने केलेल्या चौकशीचा अहवाल मागवला होता. बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एन. एच. खान यांच्या नेतृत्वाखाली ईओयूच्या पथकाने हा तपास केला आहे.
सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ‘शिक्षण मंत्रालयाला दिलेल्या आमच्या अहवालात साधारणत: तीन मुद्द्यांचा उल्लेख आहे; आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट संकेत, आंतरराज्य टोळीचा संभाव्य सहभाग आणि बिहारच्या कुख्यात ‘सॉल्व्हर्स गँग’ची संशयास्पद भूमिका.’ यापूर्वी खान यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना प्रश्नपत्रिका फुटल्याची शक्यता व्यक्त केली होती. अहवालामध्ये झारखंडमध्ये पाळेमुळे असलेल्या आंतरराज्यीय टोळीच्या सहभागाचे पुरावे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ही टोळी बिहारच्या ‘सॉल्व्हर्स गँग’बरोबर काम करते. ‘ईओयू’ने अलीकडेच या ‘सॉल्व्हर्स गँग’चा कथित सूत्रधार संजीव मुखिया याला नालंदामधून आणि झारखंडमधून चार संशयितांना अटक केली आहे. प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३० ते ३२ लाख रुपये घेण्यात आल्याचेही नितीश कुमार नावाच्या संशयिताने पोलिसांना सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जलेली प्रश्नपत्रिका हजारीबाग परीक्षा केंद्रातील असावी. बिहारमध्ये एकूण २७ केंद्रांवर ‘नीट-यूजी’ परीक्षा झाली होती.
हेही वाचा :
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच कॅन्सल झाल्यास फायदा कुणाला?
पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द; अधीक्षकांनी दिली नवी तारीख
दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप, टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय