माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी व जिओ-रिलायन्सवर बहिष्कारासाठी सकल जैन समाज, महावीर जयंती मंडळचे आवाहन

इचलकरंजी : नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्ती ही कोल्हापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक व धार्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मठामध्ये ज्या ममता आणि सेवेशी तिचा संबंध होता, ती आज वनतारा प्रकल्पात पाठवली जात आहे, हे अनेक नागरिकांच्या भावनांवर घाला असल्याचे मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर सकल जैन समाज, इचलकरंजी आणि भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता महावीर जैन भवन, मेन रोड, बँक ऑफ बडोदा मागे, इचलकरंजी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीनंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

या बैठकीत माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठीची रणनीती आखण्यात येणार असून, रिलायन्स व जिओच्या उत्पादनांवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची मागणीही अधिकृतपणे करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या विषयावर इचलकरंजी नागरिक मंचनेही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ही बैठक आणि मोर्चा त्यांनी आयोजित केलेला नसला तरी, शहरातील प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी होऊन कोल्हापूरच्या अस्मितेसाठी एकत्र उभे राहावे, अशी त्यांची भूमिका आहे.

जैन समाजाचे गुंडांप्पा रोजे आणि महावीर जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नागरिकांना शांततामय आणि संयमित पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनातून केवळ एका प्राण्याचा नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूरच्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि अस्मितेचा आवाज बाहेर येणार आहे. आता वेळ आली आहे — एकत्र येण्याची, आवाज उठवण्याची आणि आपल्या वारशाचे रक्षण करण्याची.