कोल्हापूर : ‘गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून(down) काही मंडळी मला त्रास देण्याचे काम करत आहेत. कोपऱ्या-कोपऱ्यावर सतेज पाटील सापडतोय का, हे पाहत आहेत; पण कोणी कितीही त्रास देऊ देत, मी ही कसबा बावड्याचा पोरगा आहे, कोणासमोर झुकणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना प्रचंड मताधिक्य देणार,’ असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कसबा बावडा येथे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमदेवार(down) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सतेज पाटील म्हणाले, ‘राजकारणात निष्ठा राहिलेली नाही. तरीही सतेज पाटील निष्ठेने काम करत आहे. त्याच्यामागे राहिले पाहिजे. गेल्या निवडणुकीत पक्ष विसरून मी ज्यांना मदत केली, ते आता तुम्हीच माझ्याकडे आला म्हणून सांगताहेत. आज प्रचंड त्रास देण्याचे काम केले जात आहे. हा त्रास सहन करत आहे. २००४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झालो. ज्या-ज्या वेळी मला टार्गेट करण्याचे काम केले, त्यावेळी माझी कामाची गती आणखी वाढली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘२०१४ मध्ये ज्यांना मदत केली, त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्या खंजीर खुपसण्याचा बदला २०१९ मध्ये घेतला. मी घेतलेली भूमिका जनतेला मान्य होती, त्याचमुळे संजय मंडलिक यांना २ लाख ७० हजार मताधिक्याने विजयी केले. आता मंडलिक हे सोयीस्कररीत्या विसरले आहेत. त्यामुळे त्यांनाही बावडेकरांची ताकद दाखवून देऊया.’
आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, रस्ते वाहतूक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बाहेरचे कोणीही आले तरीही कोल्हापूरची जनताच कोल्हापूरचे भविष्य ठरवते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.’ या वेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, सुनील मोदी, यांनीही मनोगत व्यक्त केले.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘एकाधिकारीशाही हद्दपार करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी इंडिया आघाडी महत्त्वाची आहे. संविधानानुसार देश चालला पाहिजे.’
हेही वाचा :
सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित… विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास
मिसळ पे चर्चा’ अन् काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल; काल्हापुरात काय घडलं?
‘राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते’; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?