इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासाठी कचरा संकलन करणाऱ्या एनडीके या खासगी कंपनीकडून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार(salary) मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी शुक्रवारी अचानक काम बंद आंदोलन छेडले. महिन्याची दहा तारीख उलटून गेली, तरीही पगार न झाल्याने शहरातील घंटागाड्या सकाळपासून रस्त्यावर फिरल्याच नाहीत. त्यामुळे ‘घंटा’ वाजलाच नाही आणि कचरा संकलन पूर्णतः ठप्प झाले.

कामगारांनी वाहनतळावर ठिय्या मांडत ‘पगार(salary) दिल्याशिवाय काम नाही’ असा ठाम पवित्रा घेतला. या अचानक झालेल्या काम बंद आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. अखेर, दुपारच्या सुमारास मक्तेदाराने थकीत पगाराचा काही भाग अदा केल्यानंतरच कामगारांनी आंदोलन मागे घेतले आणि पुन्हा एकदा शहरभर घंटा वाजायला सुरुवात झाली.
दरम्यान, यापूर्वीही वेळोवेळी अशाच प्रकारे कामगारांना वेळेवर पगार न मिळाल्याने काम ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेतील आरोग्य विभाग व मक्तेदार यांच्यात बैठकाही झाल्या असून महिन्याच्या दहाव्या तारखेपूर्वी पगार देण्याचा ठरावही झाला होता. मात्र, प्रत्यक्षात एनडीके कंपनीने निविदेतील अटीशर्तींचे पालन न करता वेळकाढूपणा केल्याचे दिसून आले आहे.
यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असून, गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांनी रस्त्यावरच ओला व सुका कचरा टाकायला सुरुवात केल्यामुळे दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही स्वच्छतेची पुरेशी व्यवस्था न झाल्यामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
मागील काही महिन्यांपासून नियमित पगार न मिळाल्याने कंत्राटी चालक व मदतनीस यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. अजूनही काही कामगारांच्या मागील फरकाच्या रक्कमा थकित आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा ‘घंटा’ बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिक व कामगार संघटनांची एकमुखी मागणी आहे.
हेही वाचा :
५००० रुपयांत द्या महाकालेश्वर मंदिराला भेट! इतकं स्वस्त टूर पॅकेज… पाहाल तर लगेच बॅग भराल
इटलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केलं चकीत, 2026 च्या T20 विश्वचषकावर मारला शिक्का! रचला इतिहास
50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका