महायुतीचं जागावाटप अडलं? ‘या’ 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना…

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही(allocation). तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, सातारा, पालघर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर मध्यवरुन महायुतीत (allocation) जागावाटपाचा तिढा कायम आहे. नाशिकचे विद्यमान खासदार आहेत ते शिवसेनेचे हेमंत गोडसे (Hemant Godse). त्यामुळे नाशिकची जागा हेमंत गोडसेंनाच पाहिजे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने नाशिकवर दावा ठोकलाय. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावेळी भुजबळांनी ओबीसींची बाजू लावून धरली होती. छगन भुजबळांना याचाच फायदा होईल असा अंदाज आहे.

नाशिकप्रमाणेच तळकोकणातही जागावाटपावरुनच (Seat Sharing) शिमगा सुरु आहे.. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये इथे राजकीय दशावतार रंगतोय. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर तळकोकणात भाजपचं चिन्ह सर्वदूर जायला हवं या भूमिकेतून भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उतरवण्याच्या तयारीत आहे..

मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण या दोन जागांवरही शिवसेना-भाजपात कुस्ती सुरु आहे. मुंबईतल्या या दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार असल्याने दोन्ही जागा आपल्याकडेच राहाव्यात अशी आक्रमक भूमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतलीय. तर या दोन्ही जागांवर भाजपची ताकद असल्याने त्या भाजपला मिळाव्यात असा दावा भाजपने केलाय.

मुंब ईशेजारच्या ठाण्याच्या जागेवरुनही महायुतीत धुसफूस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे. ठाणं आपल्याकडेच राहावं हा शिवसेनेचा आग्रह आहे. भाजपच्या ताब्यातला ठाणे लोकसभा मतदारसंघ 1996 मध्ये शिवसेनेने हिसकावला. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघेंनी ही खेळी यशस्वी करून दाखवली होती. आता पुन्हा एकदा भाजपला ठाण्यात आपलं कमळ फुलवायचं आहे. शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण भाजप बदलू शकणार का इथे खरी मेख आहे.

तीच गत साताऱ्याची. इथेही वाद सुरु आहे मात्र तो आहे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. सातारची जागा ही राष्ट्रवादीची. हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा. राष्ट्रवादीच्या पुरोगामी विचारांना मानणारा. मात्र राष्ट्रवादीसमोर आव्हान आहे ते उदयनराजे भोसलेंचं. भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार हा विश्वास उदयनराजे भोसलेंना आहे..

पालघरची जागा भाजप आणि शिवसेना या दोघांनीही प्रतिष्ठेची केलेली आहे. 2019 मध्ये भाजपचे राजेंद्र गावीत शिवसेनेच्या तिकीटावर लढून विजयी झाले होते. तेव्हा ही जागा आपल्यालाच पाहिजे ही भाजपची भूमिका आहे.. तर विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने या जागेवर शिवसेनेने दावा केलाय.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अगदी काहीच दिवसात पार पडेल. तरीही महायुतीमधल्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. हा तिढा कधी सुटणार आणि कोणता तोडगा निघणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

राष्ट्रवादीत त्या नेत्याला प्रवेश देणे ही मोठी चूकच… शरद पवारांची कबुली

.एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी

वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो