इचलकरंजी शहरातील चांदणी चौक ते श्रीपाद नगरदरम्यानचा रस्ता सध्या नागरिकांसाठी अपघाताचा सापळा ठरत आहे. विशेषतः आजगेकर यांच्या घरा समोरील भागात महापालिकेने सखल गटारीवर नळ टाकून तयार केलेला रस्ता सध्या मोठ्या धोक्याची स्थिती निर्माण करतो आहे. या ठिकाणी रस्ता खचला असून, त्यामुळे शाळेत जाणारी मुले, महिला, वृद्ध यांना तिथून जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दररोज या ठिकाणी अपघात होत असून, गटारीच्या तोंडाशी तोल जाऊन अनेक दुचाकीस्वार खाली पडतात. अपघातांमुळे गंभीर दुखापतींच्या घटना देखील समोर आल्या आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी शालेय वेळेत या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
या परिसरातील नागरिकांनी ही तक्रार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रमोद बाळासाहेब बचाटे यांच्याकडे केली असता, त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान नुकताच एक अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले आणि याची गंभीर दखल घेतली.
प्रमोद बचाटे यांनी सांगितले की, “या गटारीवर अजून एक नळ टाकणे अत्यावश्यक आहे. तो पर्याय नाकारता हा अपघातांचा प्रकार थांबणार नाही.” त्यांनी महानगरपालिकेला तसेच आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांना विनंती केली आहे की त्यांनी त्वरित पाहणी करून उपाययोजना कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात आणि काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.
शहराच्या सुरक्षेसाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ही समस्या तातडीने सोडवणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर उद्या मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची याचाही प्रश्न उपस्थित होईल.
अपघातग्रस्त रस्ता: चांदणी चौक – श्रीपाद नगर मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे!
