इचलकरंजी (दि. १२ जून २०२५) –
इचलकरंजी शहरात आनंदाने साजऱ्या होणाऱ्या कर्नाटकी बेंदूर सणाच्या दिवशीसुद्धा काही नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागला आहे. प्रभागातील कटके गल्ली परिसरात गटारीतील घाण पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून परिसरात दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या बाबत भारतीय जनता पक्षाचे श्री. प्रमोद बाळासाहेब बचाटे यांनी प्रशासनाकडे संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व प्रत्यक्षरित्या सदर समस्या अधोरेखित करत सांगितले की, “गाव आनंदात सण साजरा करत असताना माझ्या प्रभागातील नागरिक मात्र त्रासात आहेत. या गल्लीतील समस्या वारंवार सांगूनही दुर्लक्षित केल्या जात आहेत. आयुक्त मॅडम यांना याविषयी यापूर्वीच कल्पना देण्यात आली आहे, तरीही कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही, हे दुर्दैव आहे.”

आज सकाळी नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रमोद बचाटे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी इचलकरंजी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी – डॉ. नितीन भाट, SI सचिन भुते, SI किरण लाखे, वॉर्ड इन्स्पेक्टर तनवीर आगा व श्री. लालबेग यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तात्पुरत्या स्वरूपात गटारी स्वच्छ करण्यात आल्या, मात्र JCB उपलब्ध न झाल्यामुळे संपूर्ण समस्या सुटलेली नाही, असे प्रमोद बचाटे यांनी स्पष्ट केले.
“हा प्रश्न वारंवार निर्माण होतो आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,” असा ठाम इशारा श्री. बचाटे यांनी दिला आहे.
या संपूर्ण परिस्थितीमुळे सणाच्या दिवशी देखील नागरिकांना दुर्गंधी, डासांचा त्रास, व पाण्याच्या साचल्यामुळे होणारे आजार यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
