दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे ३० जुलै रोजी उदघाटन;

इचलकरंजी : इचलकरंजी येथील जुना कोल्हापूर नाका, शिवाजी नगर येथे स्थापन होणाऱ्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या भव्य उदघाटन समारंभाचे आयोजन बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी खासदार मा. श्रीमती निवेदिता माने व माजी मंत्री मा. प्रकाश अण्णा आवडे यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे असतील.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या नव्या कायदे शिक्षण संस्थेच्या वाटचालीस बळ मिळणार आहे.

हे नवीन लॉ कॉलेज शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असून येथे बी.ए.एल.एल.बी. (५ वर्षे) आणि एल.एल.बी. (३ वर्षे) हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व राज्य शासन मान्यता प्राप्त या अभ्यासक्रमांतून विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळणार आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, ही संस्था १९५४ साली श्री. बापूजी साळुंखे यांच्या प्रेरणेतून स्थापन झाली असून, ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार’ या ध्येयाने महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संस्थेच्या अखत्यारीत इचलकरंजीतील अनेक शैक्षणिक संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत.

संस्थेची शिक्षण परंपरा सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग आणि पिळवणूकविरोधी तत्वांवर आधारित पंचसूत्री मूल्यांवर उभी असून, आज संस्थेचे १२०० हून अधिक शिक्षण केंद्रे व ९०,००० हून अधिक गुरुदेव कार्यकर्ते राज्यभर कार्यरत आहेत. याच परंपरेतून इचलकरंजीत विधी शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरूवात होत आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे (सीईओ) मा. कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सीताराम गवळी, सहसचिव (अर्व) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे व कोल्हापूर विभाग प्रमुख मा. श्रीराम साळुंखे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या ऐतिहासिक क्षणी दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या प्राचार्य सी. एस. बागडी यांनी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
हे लॉ कॉलेज भविष्यात इचलकरंजी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विधी क्षेत्रातल्या संधींचे नवे दालन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.