कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हद्द वाढ नको, पण नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करा. अशा आशयाचा ठरावच संमत करून नगर विकास मंत्रालयास 51 वर्षापूर्वी तत्कालीन नगरपालिकेच्या सभागृहाने पाठवल्यामुळे कोल्हापूर (Kolhapur) शहर हद्दवाढीच घोंगड भिजत पडलं आहे. रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर महापालिकेचा 52 वा वर्धापन दिन आहे. पण आज तागायत राज्य शासनाने शहर हद्द वाढीच गिफ्ट काही दिलेले नाही.
इसवी सन 1972 मध्ये कोल्हापूर शहराची लोकसंख्या अडीच लाखाच्या पुढे गेली. त्यामुळे या शहराला महापालिका देण्याचा विचार सुरू झाला. तत्कालीन नगरपालिकेच्या सभागृहानेही राज्य शासनाकडे तशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे नगर विकास मंत्रालय होते. शहराची हद्द वाढ मागणार नसाल, तर कोल्हापूर नगरपालिकेचा महापालिकेत रूपांतर करण्याचा राज्य शासन निर्णय घेईल तथापि हद्द वाढीशिवाय महापालिका करा असा एक ठराव संमत करून पाठवण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तत्कालीन नगरपालिकेचे दोन सदस्य जे नंतरच्या काळात कोल्हापूर(Kolhapur) महापालिकेचे महापौर बनले आणि आज ते हयात नाहीत. त्यांनी विशेष सभा बोलावून त्यामध्ये ठराव केला आणि तो नगर विकास मंत्रालयाला पाठवला. त्याचवेळी हद्द वाडा करणार असाल तरच महापालिका स्वीकारू अशी भूमिका सदस्यांनी किंवा सभागृहाने घेतलीअसती तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ तेव्हाच झाली असती. आणि म्हणूनच ठराव करणारेच या शहराचे मारेकरी होते असे म्हटले तर वावगे होणार नाही.
हद्दवाढीशिवाय आणखी बरेच काही विकासाशी निगडित असलेले प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या 51 वर्षात कोल्हापूर शहराची लोकसंख्या तिप्पट किंवा त्याहून अधिक झाली, तथापि वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर शहरात आजही केवळ 30 टक्के ड्रेनेज व्यवस्था, सांडपाणी निर्गत व्यवस्था आहे.
सध्याची लोकसंख्या विचारात घेतली तर आस्थापना वरील कर्मचारी त्याच प्रमाणात वाढवणे अपेक्षित होते आणि आहे.
आजही दीड हजार पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. बहुतांशी अधिकाऱ्यांच्याकडे जास्तीच्या कामाचा भार आहे. काम जास्त आणि कर्मचारी कमी यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामाचा निपटारा वेळेत होत नाही.
शहराच्या मुख्य लोकसंख्येशिवाय जिल्ह्यातून आणि पर गावातून रोज येणाऱ्या लोकांची संख्या दोन ते अडीच लाख आहे. इतके लोक दिवसभर कोल्हापुरात(Kolhapur) असतात आणि नंतर सायंकाळी आपल्या गावाकडे जातात. त्याचाही ताण महापालिकेवर पडतो आहे. रंकाळा तलाव, केशवराव भोसले नाट्यगृह, असेच शाहू कुस्ती खासबाग मैदान याची मालकी राज्य शासनाकडे होती पण इथल्या नगरसेवकांनी प्रयत्न करून त्यांचे हस्तांतरण महापालिकेकडे करून घेतले आहे पण या तिन्ही ऐतिहासिक स्थळांची महापालिकेकडून नीटपणे देखभाल होत नाही. भोसले नाट्यगृह तर काही महिन्यापूर्वी आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. रंकाळा तलाव कमालीचा प्रदूषित झालेला आहे. शाहू खासबाग कुस्ती मैदानात गवत वाढलेले आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई चे मंदिर येथे आहे. त्याचा विकास आजही कागदावर आहे. तसेच छत्रपती घराण्याचे देवघर असलेल्या भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिराकडेही दुर्लक्ष झाले आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा मानदंड असलेला जयप्रभा स्टुडिओ खाजगी व्यक्तींच्या घशात गेलेला आहे. नितीन देसाई यांचा स्टुडिओ गोरेगाव चित्रनगरीशी जोडला जातो तर मग जयप्रभात स्टुडिओ कोल्हापूरच्या चित्रनगरीशी का जोडला जात नाही?
कोल्हापूर महापालिकेवर काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचीच सत्ता होती. तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस होती, पण तरीही कोल्हापूरचे विकासाचे प्रश्न काही सुटलेले नाहीत. आजही कोल्हापूर महापालिकेवर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची प्रशासकीय राजवटीपूर्वी सत्ता होती त्यांनीही कोल्हापूरचे काही भले व्हावे असे निर्णय घेतले नाहीत. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपला राजकीय भूगोल बिघडतो अशी भीती प्रस्थापित राजकारण्यांना वाटत असेल तर मग कोल्हापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या संभाव्य गावातील ग्रामस्थांना भीती का वाटू नये? एकूणच दरवर्षी वर्धापन दिन येतो तसाच तो रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी आला आहे आणि एका उपचार म्हणून महापालिकेच्या प्रधान कार्यालयावर विद्युत रोषणाई केलेली आहे.
हेही वाचा :
ग्रेट शोमन राज कपूर यांचे कोल्हापूरशी असलेले नातं
मंत्रिमंडळाचा शपथविधी अन् भाजपची नवी खेळी…
“ऋतिक रोशनच्या घरच्या सदस्यावर गायिकेचा धक्कादायक आरोप: ‘स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न’”