सांगलीत जागा गमावली तरी काँग्रेसमध्ये आणखी एका नेत्याचा उदय

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये महाविकास आघाडीच्या राजकारणात(leader) काँग्रेसने आपली हक्काची सांगलीची जागा गमावली असली तरी, या निमित्ताने पक्षाला विश्वजित कदम यांच्या रुपात सांगली जिल्ह्यासाठी नेतृत्व आणि राज्य पातळीवर लक्षवेधी युवा नेताही लाभला आहे. त्यांना काँग्रेस पक्षात टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना पार पाडावी लागेल, त्याचबरोबर कदम यांनाही आपल्याभोवतीचे संशयाचे धुके नष्ट करून विश्वास निर्माण करावा लागेल.

सांगली जिल्हा हा काँग्रेस(leader) पक्षाचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे आणि नंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांगलीच्या राजकारणावर वर्चस्व राहिले. वसंतदादांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील खासदार झाले असले तरी जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व होते ते वसंतदादांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांचे. विष्णूअण्णांच्या नंतर मदन पाटील यांनीही सांगलीच्या राजकारणावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सांगली शहराच्या पलीकडे विस्तारू शकले नाही.

नंतरच्या काळात पतंगराव कदम यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवली होती. याच दरम्यान जयंत पाटील यांचा राजकारणात उदय झाला आणि त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. स्वतःच्या मतदारसंघाच्या पलीकडे जिल्ह्याच्या अन्य भागात प्रभाव निर्माण करणा-या नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

एकीकडे राज्य आणि जिल्हा पातळीवर जयंत पाटील यांचे नेतृत्व मजबूत बनत असताना पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली काँग्रेस नेतृत्वहीन बनली. खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले प्रतीक पाटील निष्क्रियतेमुळे बाजूला फेकले गेले. २००९च्या मिरज दंगलीनंतर भाजपने जिल्ह्यात हातपाय पसरले आणि त्याचा फटका काँग्रेसला अधिक बसला.

लोकसभा निवडणुकीत सलग दोनवेळा भाजपकडून संजय पाटील निवडून आले. यावेळी काँग्रेसकडून आणि विशाल पाटील यांच्याकडूनही मतदारसंघावर दावा करण्यास विलंब झाला आणि ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कधी आपल्या झोळीत टाकली, ते काँग्रेसला कळालेही नाही. त्यातून काँग्रेसअंतर्गत केवळ सांगलीच नव्हे, तर मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकारण रंगले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी विचारविनिमय करूनच उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याची प्रारंभी चर्चा होती. परंतु ती खोटी असल्याचे विश्वजित कदम यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी आग्रह सोडला नाही आणि आक्रमक होताना मर्यादांचे उल्लंघनही केले नाही. सांगलीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी घडामोडींचा सगळा पट उलगडलाच, परंतु त्याचवेळी शिवसेनेला थेट इशाराही दिला. लोकसभेला तुम्हाला मिळणारी शंभर टक्के मते काँग्रेसची असतील, त्या आधारे विधानसभेला दावा करायला येऊ नका, अशा शब्दात ठणकावले. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.

सांगलीची जागा गमावली तरी नेतृत्व म्हणून विश्वजित कदम यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी काढलेली दुष्काळदिंडी लक्षवेधी ठरली होती. परंतु आता काँग्रेसच्या मेनस्ट्रीम राजकारणात ते पुढे आले आहे. कोल्हापूरचे सतेज पाटील, अमरावतीच्या यशोमती ठाकूर, नागपूरचे सुनील केदार, लातूरचे अमित देशमुख, धुळ्याचे कुणाल पाटील यांच्या पंगतीत विश्वजित कदम यांचे नाव सामील झाले आहे.

नेतृत्वहीन बनलेल्या सांगली जिल्हा काँग्रेसला त्यांच्या रुपाने नेतृत्वही मिळाले आहे. त्यामुळे आगामी कळातील त्यांचा जिल्हांतर्गत संघर्ष भाजपशी नव्हे, तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याशी असू शकेल. काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा विश्वजित कदम यांचे नाव पहिले असते. त्यांचे सासरे अविनाश भोसले यांच्या अटकेचा संदर्भ त्यासाठी दिला जातो. परंतु सर्व अफवा खोट्या ठरवून विश्वजित कदम काँग्रेसमध्ये टिकून राहिले आहेत, काँग्रेसच्या उमेदवारासाठी आग्रही राहिले आहेत. सांगलीच्या वादात विश्वजित कदम यांचे नेतृत्व चमकले.नेतृत्वहीन सांगली काँग्रेसला नव्या नेतृत्वाचा लाभ.

हेही वाचा :

कोल्हापुर महापालिकेनं पीएम मोदी येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!

कोल्हापूरात मोदींच्या सभेसाठी दिल्लीची यंत्रणा सतर्क; 12 किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त !

क्षीरसागरांनी राजघराण्याची दुखती नस दाबली, कोल्हापूरच्या राजकारणात ‘कदमबांडे’ नावाची एन्ट्री