कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्ष सदस्यांना चहापानासाठी निमंत्रित केले जाण्याची प्रथा आहे. विधिमंडळाचे(Legislative) अधिवेशन सुरळीत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावे अशी भूमिका किंवा हेतू त्यामध्ये असतो. तथापि या चहापान कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकतात.

विरोधी पक्षाचे आमदार चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत ही परंपरा आहे आणि त्यातून विधिमंडळ अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर अधिवेशनात जोरदार आवाज उठवू असा संदेश विरोधकांच्याकडून सत्ताधार्यांना दिला जातो. यंदाही मुंबईत सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवारी विरोधी पक्षांकडून चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला होता. आणि त्यात गैर म्हणावे असे काही नाही. त्यांनी परंपरेचे पालन केले असे म्हणता येईल.
सोमवारपासून विधिमंडळाचे (Legislative)अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी गाजवला. विरोधकांनी नैतिकतेचा मुद्दा मांडला तर सत्ताधारी पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमाचा मुद्दा मांडला.
विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपासून केली जाते आहे. त्यामध्ये जसे विरोधी पक्ष आहेत तसेच सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारही आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा आहे आणि तो मंत्री धनंजय मुंडे यांची सावली म्हणून वावरतो आहे आणि वावरला आहे आणि म्हणून नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके, तसेच संदीप क्षीरसागर यांनी ठळकपणे घेतली आहे. आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी हीच मागणी लावून धरली आहे. आता त्यामध्ये विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीची भर पडली आहे.
महाराष्ट्राचे “दोन गुंडे माणिकराव कोकाटे आणि मुंडे”अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या(Legislative) बाहेर सोमवारी दिल्या. आरोप सिद्ध झाले तर निश्चितपणे कारवाई करू असा युक्तिवाद मुंडे यांच्या संदर्भात महायुती सरकारकडून केला जात होता आता कोकाटे यांच्या विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना दोन वर्षांची शिक्षासुद्धा न्यायालयाने ठोठावली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना”हा सूर्य आणि हा जयद्रथ”असल्याचे सांगून त्यांना धर्म संकटात टाकले आहे. या धर्म संकटातून त्यांची सुटका विधानसभेच्या सभापतींच्या अहवालावरून राज्यपाल करतील. आणि तशीच भूमिका फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना घेतलेली आहे.
राजिनाम्याचा हा विषय प्रामुख्याने विधान परिषदेमध्ये लावून धरण्यात आला होता. तथापि कोकाटे आणि मुंडे हे दोघेही कनिष्ठ सभागृहाचे सदस्य असल्यामुळे त्यावरची चर्चा विधानसभेमध्ये करता येईल असा युक्तिवाद फडणवीस यांनी केला असला तरी हे दोघेही मंत्री असल्यामुळे आणि ते दोन्हीही सभागृहाना बांधील असल्यामुळे विधान परिषदेमध्ये हा विषय उपस्थित करता येतो असा कायदेशीर मुद्दा पुढे आणला गेला असला तरी नंतर या विषयावर विधान परिषदेत चर्चा झाली नाही.
माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे म्हणून आणि धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड याचे पाठीराखे असल्यामुळे या दोघांचेही राजीनामे घेण्यासाठी विरोधी पक्ष या अधिवेशनात तयारीनिशी उतरलेला आहे. अधिवेशन सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी संख्याबळाचा विचार न करता नैतिकतेचा विचार झाला पाहिजे असे सर्वसामान्य जनतेला सुद्धा वाटते. यापूर्वी काही मंत्र्यांच्या संदर्भात घडलेले आहे. त्यांना मंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनाच्या निमित्ताने गोवारी या आदिवासी जमातीने विधिमंडळावर मोर्चा नेला होता आणि तेव्हा झालेल्या धुमश्चक्रीत 105 गोवारी आदिवासी मृत्युमुखी पडले होते. तेव्हा आदिवासी समाज खात्याचे मंत्री असलेल्या मधुकर पिचड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
विधानसभेत महायुतीचे भक्कम बहुमत आहे. संख्याबळाच्या तुलनेत विरोधी पक्षाची अवस्था बिकट आहे. पण तरीही सरकारला सर्व बाजूने घेण्याची रणनीती त्यांच्याकडून आखण्यात आलेली दिसते. आदित्य ठाकरे यांनी नऊ पानांचे आरोप पत्रच रविवारी वाचून दाखवले आहे. याच आरोप पत्रावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार कल्ला होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या(Legislative) अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये बेबनाव आहे, फडणवीस विरुद्ध शिंदे असे शीतयुद्ध सुरू आहे असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कडून विशेषता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे आणि महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आमच्या मध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, मने कलुषित नाहीत आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन सरकार चालवत आहोत असा खुलासा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांना करावा लागला. तथापि महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही.
भारतीय जनता पक्ष हा पूर्वी साधनशुचिता हा शब्द वारंवार वापरत असे. आम्ही नीतिमत्ता राखून, नैतिकता ठेवून राजकारण करत आहोत, करतो आहोत, असे छाती फुगून सांगत असायचा. आता याच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मनगुंटीवार, गिरीश महाजन यांनी नैतिकतेचा मुद्दा बाजूला ठेवून पुराव्याचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि तो धनंजय मुंडे यांच्या समर्थनासाठी उचलला जातो आहे. हा या पक्षामध्ये झालेला विलक्षण बदल म्हणावा लागेल.
हेही वाचा :
पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल
घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी
इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी