कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणात पुन्हा आजी-माजी आमदार!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचेच नाही तर दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा विधानसभा (assembly) मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ होय. या मतदारसंघात सातत्याने महाडिक विरुद्ध पाटील या पारंपारिक शत्रू असलेल्या राजकीय घराण्यामध्ये घमासान लढाई होते.

भारतीय जनता पक्षाने रविवारी त्यांच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूर दक्षिण मधून माजी आमदार अमल महाडिक तर इचलकरंजी मतदारसंघातून नुकतेच भाजपवासी झालेले डॉक्टर राहुल आवारे या दोघांची नावे आहेत. इचलकरंजी मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रतिस्पर्धी उमेदवार अद्याप ठरलेला नाही मात्र कोल्हापूर दक्षिण मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमल महाडिक यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. यंदाची ही निवडणूक आजी-माजी आमदारांमध्ये होत आहे.

विधानसभा(assembly) मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कोल्हापूर दक्षिण हा नवीन विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. कोल्हापूर महापालिकेचे 28 प्रभाग या मतदारसंघात येतात. याशिवाय कागल विधानसभा मतदारसंघातील 22 गावे या मतदारसंघात येतात. कोल्हापूर दक्षिण मधील”पाचगाव”हे छोटेसे गाव महादेवराव महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांची राजकीय संघर्षाची राजधानी म्हणून ओळखले जाते. पाचगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून, सत्ताकारणातून, महाडिक विरुद्ध पाटील या संघर्षाची सुरुवात झाली आणि नंतर त्याला रक्तलांछित स्वरूप सुद्धा आले. त्यामुळेच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेले असते.

हा मतदारसंघ कधी काँग्रेसने जिंकला तर कधी भाजपने जिंकला आहे. अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा या मतदारसंघातून पराभव केला होता तर सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी 2019 मध्ये भाजपाच्या अंमल महाडिक यांना पराभवाची धूळ चारली आहे. पूर्वीची महादेवराव महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यातील लढत आता दुसऱ्या पिढीत आली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही महाडिक विरुद्ध पाटील यांच्यातच घमासान होणार आहे.

कोल्हापूर दक्षिण हा विधानसभा(assembly) मतदारसंघ युतीच्या काळातही भाजपच्या वाटणीला आलेला आहे. या मतदारसंघात अशी स्थिती होती की भारतीय जनता पक्षाला इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळत नव्हता. महाडिक कुटुंबीयांनी भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केल्यानंतर या मतदारसंघात भाजपला तगडा उमेदवार मिळालेला आहे. कोल्हापूर दक्षिण मध्ये आपणालाच उमेदवारी मिळणार हे अभिप्रेत असल्यामुळेच गेल्या एक महिन्याभरापासून अमल महाडिक यांनी मतदारसंघात पोस्टरबाजी सुरू केली आहे.

गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातील बऱ्याच गावातील समस्या आहे तशाच आहेत. त्या सोडवण्यासाठी विद्यमान आमदारांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत अशा आशयाचे डिजिटल फलक महाडिक यांच्याकडून लावले गेले आहेत तर गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात आपण किती निधी आणला त्याची आकडेवारी सांगणारे डिजिटल फलक ऋतुराज पाटील यांच्याकडून संपूर्ण मतदारसंघात लावले गेले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच या दोघा पारंपारिक राजकीय शत्रूंमध्ये पोस्टर युद्ध सुरू आहे.

गेल्या पाच वर्षात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले विद्यमान आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या ताब्यात असलेला गोकुळ हा मोठी अर्थसत्ता असलेला दूध संघ काढून घेतला आहे, तर महादेवराव महाडिक यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक जिंकून सत्ता राखली आहे.

याच साखर कारखान्याच्या निवडणूक राजकारणातून महाडिक आणि पाटील हे दोन्ही गट बिंदू चौकाकडे एकमेकांचा राजकीय हिशोब सांगण्यासाठी एकत्र यायला निघाले होते. पण पोलिसांनी हा संघर्ष कौशल्याने टाळला. ही एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात लोकशाहीच्या माध्यमातून मांडण्यात आलेला राजकीय सारीपाट, हा कोणाची अडवणार वाट हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा:.

सलमान खानने आयुष्यात पहिल्यांदाच ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर सोडलं मौन

दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्…