बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीत धांदल – भाजप कडून २५ जूनला कामगार आयुक्तालयावर मोर्चा

हातकलंगले व शिरोळ परिसरात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार घराघरात जाऊन कामगारांची तपासणी करण्याचे कंत्राट एका खाजगी एजन्सीला देण्यात आले होते. मात्र, या तपासणीसाठी आवश्यक असलेला डीएमएलटी (DMLT) कोर्स पूर्ण न केलेल्या व्यक्तीकडूनच आरोग्य तपासणी केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय मदत कक्षप्रमुख श्री. शुभम बर्गे यांनी सदर बाबीची शहानिशा केल्यानंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाला. तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीच्या कागदपत्रांची आणि आरोग्य अहवालाची सखोल तपासणी केल्यानंतर आढळून आले की संबंधित व्यक्तीकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतानाही वशिल्याच्या आधारे त्याची नियुक्ती करण्यात आली होती.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आक्षेप नोंदवत दबाव निर्माण केला असता, संबंधित खात्यामध्ये अनेकजण अपात्र असूनही आरोग्य तपासणी करत असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे वैध आरोग्य तपासणी नसेल अशा कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या दवाखान्यात उपचार मिळणार नाहीत, असा शासनाचा नियम असून त्यामुळे गरजूंना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे.



या पार्श्वभूमीवर श्री. शुभम बर्गे यांनी स्वतः योग्य ती पूर्तता करून संबंधित कामगाराची पुन्हा तपासणी करून घेतली असता, मूळ आरोग्य तपासणी रिपोर्ट आणि दवाखान्यातील रिपोर्ट यामध्ये 100% तफावत आढळून आली. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर गैरव्यवस्था व अपात्र व्यक्तींची भरती झाल्याचा ठोस पुरावा मिळाला आहे.

या प्रकाराविरोधात भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून, येत्या २५ जून रोजी कोल्हापूर येथील कामगार आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे संबंधित अपात्र भरती करणारे अधिकारी, रक्त तपासणाऱ्या प्रयोगशाळेतील जबाबदार अधिकारी आणि खाजगी एजन्सी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

भाजपचे वैद्यकीय मदत कक्षप्रमुख श्री. शुभम बर्गे यांनी यासंदर्भात आवाहन केले आहे की, या विभागात अन्य कोणालाही यासारखी फसवणूक किंवा तक्रार असेल, तर त्यांनी पुराव्यासहित संपर्क साधावा. संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे, व्हिडीओ व पुरावे डीवायएसपी समीर सिंग साळवी यांच्याकडे सादर करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.

ही बाब केवळ कामगारांच्या आरोग्याशी संबंधित नसून, त्यांच्या हक्कांवर घाला आहे. त्यामुळे या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी आता जनतेकडून जोर धरू लागली आहे.