मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पुढील आदेशापर्यंत राहणार बंद!

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि मुंबईकरांसाठी सर्वात आकर्षक ठिकाणी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया(gateway of india). रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटक आणि मुंबईकरांची मोठी गर्दी असते. रविवारी तर सकाळपासूनच गेट वे ऑफ इंडियाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत खास क्षण घालवण्यासाठी लोकं या ठिकाणी गर्दी करतात. मात्र आजच्या रविवारी पर्यटकांना आणि मुंबईकरांना या गेट वे ऑफ इंडियाला जाऊन सुट्टीचा आनंद घेता येणार नाही. कारण आज गेट वे ऑफ इंडिया पर्यटक आणि मंबईकरांसाठी बंद राहणार आहे.

आज सकाळी 10.00 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत गेटवे ऑफ इंडिया (gateway of india)बंद राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून अजूनही राजकीय वातावरण तापले आहे. 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणावरून राजकीय नेत्यांकडून एकमेंकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राजकीय पक्षांमध्ये अनेक मतभेद सुरु आहेत. या प्रकरणी आज महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला ‘सरकारला जोडे मारा’ असे नाव देण्यात आले आहे. हुतात्मा चौकातून मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे आज गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी खुला राहणार नाही.

मुंबईत येणारे पर्यटक आज गेट वे ऑफ इंडियाला भेट देऊ शकणार नाहीत. हे पर्यटन स्थळ आज लोकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. आज सकाळी 10.00 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत गेटवे ऑफ इंडिया पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांसाठी दिवसभर बंद करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे की, सर्व पर्यटकांना कळवण्यात येतं की, आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी रॅली असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहे.

मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पाहिल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. कारण मुंबई आणि गेट वे ऑफ इंडियाचं एक अतुट नात आहे. हे ठिकाण मुंबई पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे, जिथे दररोज हजारो लोक जमतात. रविवारी ही गर्दी दुप्पट होते. मात्र, आज, १ सप्टेंबरसाठी गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा:

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका; LPG सिलिंडरची भाववाढ

‘रील्स’ पाहण्याची लहानशी आदत होऊ शकते गंभीर आजार: तज्ज्ञांचा इशारा

“भारताच्या विविधतेतील एकतेला धरून सरकारने प्रत्येक धर्माचे रक्षण करावे” फारूक अब्दुल्ला