आयर्लंडचा प्रमुख ऑल राउंडर(cricket) सिमरनजीत सिंह उर्फ सिमी सिंह हा सध्या जगण्यासाठी संघर्ष करत आहे. यकृत (लिव्हर) निकामी झाल्याने त्याला गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. ऑफ स्पिनर आणि मिडल ऑर्डर फलंदाज सिमी याचं लवकरच यकृत प्रत्यारोपण होणार आहे. सिमी सिंहचा जन्म हा भारतात झाला होता. एकेकाळी त्याने उदरनिर्वाहासाठी टॉयलेट साफ करण्याचे सुद्धा काम केले होते.
सिमी सिंहचा(cricket) जन्म हा पंजाब राज्यातील मोहाली येथे झाला होता. त्याने अंडर 14 आणि अंडर 17 मध्ये पंजाबचं प्रतिनिधित्व केले होतं, परंतु अंडर 19 टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही. मग हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करून तो 2005 मध्ये आयर्लंडला गेला. तेथे सुद्धा 2006 रोजी व्यावसायिक खेळाडू म्हणून तो डबलिनच्या मालाहाइड क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला.
आयर्लंडमध्ये राहणं सिमी सिंहसाठी अजिबात सोपं नव्हतं. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, तो एका दुकानात पार्ट टाईम काम करायचा तेथे त्याला टॉयलेट सुद्धा साफ करावे लागायचे. मात्र सिमी हरला नाही त्याने परिस्थितीशी झुंज दिली आणि क्रिकेटवर फोकस केला. 2017 पासून त्याने आयर्लंडसाठी लिस्ट ए क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच वर्षी आयर्लंडकडून त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.
सिमी सिंहचे सासरे परविंदर सिंह यांनी सिमीच्या आरोग्याविषयी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली. परविंदरने सांगितले की, जवळपास पाच ते सहा महिन्यांपूर्वी सिमी आयर्लंडमध्ये असताना त्याला अचानक ताप आला. हा ताप अनेक दिवस येत जात होता. तेथे सिमीची आरोग्य तपासणी करण्यात आली, मात्र त्यात काही स्पष्ट झाले नाही.
तेथील डॉक्टरांनी सांगितले की त्यांना सिमीच्या आजाराचं कारण सापडत नाही त्यामुळे ते त्याच्यावर उपचार सुरु करू शकत नाहीत. सिमीची तब्बेत खालावत होती त्यामुळे त्याला भारतात आणले गेले येथील डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यावर आढळून आले की सिमीचे यकृत निकामी झाले आहे. ३ सप्टेंबर रोजी त्याला मेदांता येथे आणण्यात आले. काही दिवसात सिमीचे यकृत प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
सिमी सिंहची पत्नी अगमदीप कौर ही त्याला यकृत दान करणार आहे. सिमीच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, ‘सुदैवाने, सिमीचा रक्तगट AB+ आहे, याचा अर्थ त्याला कोणत्याही व्यक्तीचे रक्त चालू शकते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सिमीची पत्नी त्याला यकृत दान करू शकते. सिमीचं यकृत प्रत्यारोपण लवकरच होणार असून यामुळे त्याला नवजीवन मिळेल अशी आशा डॉक्टरांना आहे.
सिमी हा आयर्लंडच्या आघाडीच्या क्रिकेटर्सपैकी एक असून त्याने 2017 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आयर्लंडकडून 35 वनडे आणि 53 टी 20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 39 वनडे विकेट्स आहेत तर टी 20 मध्ये त्याने एकूण 44 विकेट्स घेतले आहेत.
हेही वाचा:
अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार की सुटका?
महायुतीचं टेंशन वाढलं?; शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार
घपला होताच सरकार सावध, लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची आता कसून तपासणी होणार