शक्तीपीठ महामार्गावर तापलेलं राजकारण….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सुमारे 80 हजार कोटी रुपये खर्चाच्या नियोजित शक्ती पीठ महामार्गासाठी(Highway) शासनाकडून सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही प्रखर विरोध आहे आणि विरोधकांचे नेतृत्व काँग्रेसचे सतेज पाटील , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडे आहे. आणि त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी, समर्थनाचा मार्ग सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांना मैदानात उतरवले आहे.

नागपूर ते कोकण आणि तेथून पुढे गोवा असा हा शक्तीपीठ महामार्ग(Highway) असून असून तो कोल्हापुरातून जाणार आहे. अगदी सुरुवातीला मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे असे सात बाऱ्यांचे उतारे पुरावे म्हणून घेऊन ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. पण नंतर याच शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली.

आम्ही आमची सुपीक जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली. या संदर्भात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती पीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या(politics) वर लादणार नाही असे स्पष्ट केले. पण त्याचवेळी त्यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग मार्गी कसा लागेल याचाही विचार केला.

फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेले अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड मार्गे शक्तीपीठ महामार्ग न्यावा, या भागातील शेतकऱ्यांचा त्याला विरोध नाही अशी मागणी करून हा प्रश्न एका वेगळ्या वाटेवर नेला. त्यांनी मुंबईत शेतकऱ्यांचे सातबारा उतारेही नेले होते. या महामार्गाला(Highway) प्रखर विरोध होऊ लागल्यानंतर हा महामार्ग होणे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी किती गरजेचे आहे हे काही जणांच्याकडून सांगितले जाऊ लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे समर्थन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. शक्ती पीठ महामार्गाला विरोध करणारे नेते हे विकासाला विरोध करत आहेत, विरोधासाठी विरोध करत आहेत, पक्षीय राजकारण करत आहेत असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्नही झाला आहे आणि आजही होतो आहे.

एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा महामार्ग(Highway) समर्थनासाठी मोठ्या तयारीने उतरले आहेत. राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांचा विरोध हा स्वतःचे राजकारण टिकवण्यासाठी असल्याची टीका त्यांनी सुरू केली आहे. तर मग आम्ही हा शक्तिपीठ महामार्ग चंदगड मधून पुढे नेऊ असे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून केलेला आहे. पर्याय म्हणून चंदगडचा मुद्दा पुढे आल्यानंतर आता तेथील शेतकरीही आम्ही आमच्या जमिनी देणार नाही असे सांगून विरोध करू लागले आहेत.

सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे म्हणून महायुती मधील एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा पवार गट यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले नाहीत. त्यांनी या प्रश्नावर सावध पवित्रा घेतलेला दिसतो. सुरुवातीला हसन मुश्रीफ हे समर्थनासाठी पुढे आले होते, पण आता त्यांची पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून हा महामार्ग होऊ नये असे त्यांना वाटते आहे तर एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार क्षीरसागर हे शेतकऱ्यांना महामार्गाच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीत विरोधकांच्याकडून शक्तीपीठ महामार्ग हा प्रचाराचा मुद्दा केला जाणार आहे. हा महामार्ग ज्या तालुक्यातून जाणार आहे तेथे महायुतीची राजकीय अडचण केली जाऊ शकते. त्यामुळे या निवडणुका झाल्यानंतरच शक्तीपीठ महामार्ग महायुतीकडून विचारात घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

शक्तीपीठ महामार्गासाठी(Highway) बाजारभावापेक्षा जादा नुकसान भरपाई देण्यात येईल असे गोड आश्वासन दिले जाऊ लागले आहे. वास्तविक नुकसान भरपाई पेक्षा जमिनीला जमीन देण्याची तयारी शासनाने दाखवणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे पुनर्वसन शेतकऱ्याचे समाधान होईल अशा पद्धतीने केले जाईल असा विश्वास योजना कर्त्यांनी शेतकऱ्यांना दिला पाहिजे.

सुपीक जमिनी कमीत कमी या प्रकल्पात जातील , शासकीय जमिनीतून, क्षारपड जमिनीतून हा शक्तिपीठ महामार्ग नेता येऊ शकेल काय याचाही विचार प्रामुख्याने केला पाहिजे. इतर जिल्ह्यात या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही असे शासनाच्या वतीने सांगितले जात असले तरी भूसंपादन किंवा किंवा मोजणी ही पोलीस बंदोबस्तात मग का केली जाते असा सवाल उपस्थित केला जातो आहे आणि त्याचे उत्तर सरकारकडून समाधानकारक मिळत नाही हे वास्तव आहे.

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर