इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खाजगी शाळांच्या पातळीवर नेण्याचा निर्धार मनपा प्रशासनाने केला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
१६ जून रोजी शाळा सुरू होत असून, पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे मनपाच्या वतीने आनंदात स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण प्रशासकीय आणि शैक्षणिक कर्मचारी वर्ग शाळांमध्ये हजर राहणार आहे. नववर्षाच्या प्रारंभाला विद्यार्थ्यांना सकारात्मक अनुभव मिळावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

सध्या इचलकरंजी शहरात एकूण १०० मनपा शाळा असून, त्यापैकी ३४ शाळा कार्यरत आहेत. प्राथमिक शाळांमध्ये ७२३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर शाहू हायस्कूलमध्ये सुमारे ८०० विद्यार्थी आहेत. या शाळांमधील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी डागडुजीचा आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
यावर्षी इयत्ता १ ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनपाच्या वतीने दोन गणवेश मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी शाळा समितीच्या खात्यावर जमा करण्यात आलेला असून, प्रत्येक शाळेला गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके यांसह इतर एकूण १९ प्रकारचे शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा आर्थिक भार पालकांवर न पडता विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

याशिवाय, जर पालकांनी आपल्या मुलांना मनपाच्या शाळांमध्ये ॲडमिशन घेतले, तर त्यांना मालमत्ता करात १० टक्के सूटही मिळणार आहे. ही सवलत पालकांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणार असून शाळांकडे आकर्षण वाढवणारी ठरणार आहे.
महानगरपालिकेचा उद्देश स्पष्ट आहे – दर्जेदार शिक्षण, उत्तम सुविधा आणि आर्थिक मदत यांचा समतोल साधून शाळांना आणि विद्यार्थ्यांना सक्षम करणे. या निर्णयामुळे मनपाच्या शाळांवरील विश्वास वाढेल आणि अधिकाधिक पालक आपल्या पाल्यांसाठी या शाळांची निवड करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.