इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियान(Swachh Bharat Mission) २०२५ अंतर्गत देशभरातील शहरे आणि महापालिकांचा स्वच्छतेच्या निकषावर करण्यात आलेल्या क्रमवारीत इचलकरंजी महापालिकेने यंदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्तरावर इचलकरंजीचा ३३वा क्रमांक तर महाराष्ट्रात १६वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

ही क्रमवारी केंद्र सरकारच्या गृह व नगरविकास मंत्रालय आणि स्वच्छ भारत अभियान(Swachh Bharat Mission) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठरवण्यात आली असून, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जनजागृती, जनसहभाग आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या विविध निकषांवर आधारित आहे.
महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांची यंत्रणा बळकट केली, जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले आणि घराघरात कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर भर दिला.

या यशामागे इचलकरंजीकरांचे सहकार्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियोजन आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता ही महत्त्वाची कारणे आहेत, असे मत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
हे यश केवळ सुरुवात आहे. स्वच्छतेच्या या चळवळीत प्रत्येक नागरिकाने सहभागी होणे आवश्यक आहे. “स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढे येऊया.
हेही वाचा :
“कलानगरीची कविता” संग्रहात रोहित शिंगे यांच्या कवितांचा समावेश
‘ही’ आहे भारतातील नंबर 1 दारू, अंतिम व्हिडीओ पटकावला मानाचा किताब
इचलकरंजीत गवा रेड्याचा थरार! नागरी वसाहतीत रात्री उधळला गवा रेडा