इचलकरंजी (प्रतिनिधी) :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आणि महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या उपक्रमाअंतर्गत एक अभिनव प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. वार्ड क्रमांक १२ मधील राजाराम स्टेडियमजवळील कचरा पॉईंट बंद करून त्या ठिकाणी आकर्षक स्वरूपात हरित कट्टा तयार करण्यात आला आहे.
या उपक्रमात टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून परिसरात छोटी झाडे लावण्यात आली असून, एक सुंदर आणि स्वच्छ जागा निर्माण करण्यात आली आहे. यामुळे केवळ परिसराचा सौंदर्यवाढच नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही निर्माण झाली आहे.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा पॉईंट कायमचा बंद ठेवावा, यासाठी प्रयत्न सुरू केले असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
स्वच्छता, हरित वातावरण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी महानगरपालिकेचा हा उपक्रम इतर वॉर्डांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे. इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने असेच उपक्रम पुढे राबवण्यात येतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.