इचलकरंजीत AI वर्कशॉपला उदंड प्रतिसाद – 150 पेक्षा अधिक साधकांची उपस्थिती

इचलकरंजी : हेल्दी लाइफस्टाइल फाउंडेशन व नारीशक्ती सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथील साधना मंदिर येथे “दैनंदिन जीवनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)” या विषयावर आधारित विशेष वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास इचलकरंजी शहर व परिसरातील 150 पेक्षा अधिक साधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

डिजिटल युगात ChatGPT, Meta, Canva, Deepseek यांसारख्या AI साधनांचा वापर आपले दैनंदिन जीवन अधिक सुलभ, स्मार्ट आणि कार्यक्षम कसा बनवू शकतो, याविषयी या कार्यशाळेमध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विविध तांत्रिक संकल्पना साध्या, सोप्या भाषेत समजावून देण्यात आल्या, तसेच प्रत्यक्ष डेमोद्वारे या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

कार्यक्रमामध्ये महिलांसाठी, गृहिणी आणि उद्योजिकांसाठी, विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक आणि व्यावसायिकांसाठी AI तंत्रज्ञान किती उपयुक्त आहे हे उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आले. उपस्थित साधकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत, भविष्यात अशा उपयुक्त कार्यशाळा अधिक प्रमाणात आयोजित कराव्यात अशी मागणी आयोजकांकडे केली.

सत्राचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने झाले असून, हे सत्र केवळ माहितीपरच नव्हे तर प्रत्यक्ष वापरासाठी मार्गदर्शक ठरले असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.