लोकसभेच्या धामधूम सुरु असून प्रत्येक उमेदवाराकडून(politics) जोरदार तयारी केली जातेय. यंदाची लोकसभा ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात अस्मितेची लढाई झाली आहे. बारामती, सातारा, शिरुर, सांगली यांसारख्या अनेक लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे.
त्यामुळे यंदाच्या लोकसभेत(politics) कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईलच. पण त्याआधीच अभिजीत बिचुकलेंनी काही लोकसभा मतदारसंघातील जिंकणाऱ्या उमेदवारांची यादी सांगितली आहे. एबीपी माझाच्या ‘आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे’ या विशेष कार्यक्रमात धडाकेबाज अंदाज वर्तवले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभेतही बिचुकले मैदानात आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.
अभिजीत बिचुकले हे कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाविरोधात म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात होते. वरळी विधानसभा मतदारसंघातून अभिजीत बिचुकलेंनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
साताऱ्यात कोण बाजी मारणार असा प्रश्न यावेळी अभिजीत बिचुकलेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, सध्याची साताऱ्याची परिस्थिती पाहता, साताऱ्यात पाठिमागे जी गोष्ट झाली होती साताऱ्यात त्याची पुनरावृत्ती व्हायला काही हरकत नाही. त्याचप्रमाणे जर अजित पवार आता शरद पवारांसोबत असते तर तिथे त्यांचा दबदबा असता.
जर ते आता त्यांच्यासोबत असते तर त्यांना 24 जागा मिळाल्या असत्या. पण आता त्यांच्याकडे एकच जागा निवडून येणार, ती म्हणजे आढळराव पाटलांची. सुनेत्रा पवारही हारतील. महाराष्ट्रातलं गणित कसं पाहता, यावर अभिजीत बिचुकले म्हणाले की, सांगलीत संजयकाका, साताऱ्यात शशिकांत शिंदे, बारामती सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये आढराळराव पाटील येणारच, पुण्यात मुरलीधर मोहोळ, उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड येणारच, अशी भविष्यवाणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.
तुम्ही वरळीला परत का नाही गेला, यावर त्यांनी म्हटलं की, मी तिथे गेलो होतो, मी तिथल्या लोकांना विचारलं की तुम्ही मला मतदान का केलं नाही. पण काही गोष्टी समजून घ्याव्या लागल्यात. तुम्ही प्रामाणिकपणे राजकारण करणार असाल तर कशी मतं तुम्हाला मिळतील? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, आज माझ्यासारख्या सुज्ञ निर्व्यसनी माणसाला लोकं का निवडून देत नाही, तर मी लोकांना दारु देत नाही, म्हणून लोकं मला निवडून देत नाहीत. मी पोरांना चांगलं जेवण देईन. पण हा सगळा जो गोंधळ सुरु आहे, तो आपल्याला पुढच्या काळात कमी करायचा आहे.
रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खडतर प्रवास एकनाथ शिंदेंनी केलाय. त्यासाठी मी आजही त्यांचं कौतुक करतो. पण श्रीकांत शिंदेंचं कार्य काय? मी मागेही म्हटलं होतं, उदयनराजेंच्या नावातून छत्रपती काढून टाका त्यांचं कर्तृत्व काय? बाळासाहेबांचा नातू सोडला तर आदित्य ठाकरेंचं काय? तसंच एकनाथ शिंदेंचा म्हणून श्रीकांत शिंदे आहेत, तिथे जर मी जातोय तर आमच्या दोघांची लढत आहे. हे जर लोकांना कळलं तर कल्याण डोंबिवलीत परिणाम वेगळं दिसतीलच, असंही अभिजीत बिचुकले म्हणाले.
हेही वाचा :
ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, शिंदे गटात प्रवेश करा अन्यथा…
OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? Video Viral
‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर…’ फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस?