दररोज ४०० रुपये गुंतवा अन् ७० लाख मिळवा, पोस्टाच्या या योजनेत मिळेल जबरदस्त परतावा

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत दररोज ४०० रुपये गुंतवून पालक ७० लाखांपर्यंत रक्कम मिळवू शकतात. ही योजना मुलीच्या भविष्याची सुरक्षित आर्थिक हमी देते.पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक (Investment)करणं म्हणजे सुरक्षिततेसह चांगला परतावा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग. अनेक सरकारी योजना अशा आहेत ज्या मॅच्युरिटीपर्यंत स्थिर आणि हमखास परतावा देतात.

मात्र, बचतीसह योग्य गुंतवणूक(Investment) करणेही तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा लोक लघु बचत योजनांमध्ये फारच कमी रक्कम गुंतवून समाधान मानतात, त्यामुळे त्यांना भविष्यात फारसा फायदा होत नाही. जर सुरुवातीपासूनच ठराविक आणि मोठ्या रकमेची शिस्तबद्ध गुंतवणूक केली, तर भविष्यात मोठा नफा मिळवता येऊ शकतो.
पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक योजना आहे, जी मुलीच्या भविष्याची आर्थिक तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

या योजनेअंतर्गत ८.२ टक्के व्याजदर असून ती संपूर्णपणे करमुक्त आहे. ही योजना फक्त मुलीच्या नावावर उघडता येते. यामध्ये पालक आपल्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी खाते सुरू करू शकतात. एका कुटुंबातील दोन मुलींसाठी खाते उघडण्याची परवानगी आहे. मात्र जुळ्या मुली असल्यास तीन मुलींसाठीही खाती सुरू करता येतात.सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवता येतात.

गुंतवणुकीची कालमर्यादा १५ वर्षांची असते, पण खातं मॅच्युरिटीसाठी २१ वर्षांपर्यंत सुरू राहतं. जर गुंतवणूक वेळेवर न केल्यास, म्हणजे किमान २५० रुपयेही जर एखाद्या आर्थिक वर्षात जमा न केले, तर खाते डिफॉल्ट स्थितीत जाईल. अशावेळी पुन्हा १५ वर्षांच्या आत खाते सक्रिय करता येते.

खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी, म्हणजे मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, थोड्याफार प्रमाणात पैसे काढण्याची मुभा असते. हे पैसे एकरकमी किंवा वर्षातून एकदाच अशा हप्त्यांमध्येही काढता येतात. मात्र पूर्ण रक्कम फक्त मॅच्युरिटीवेळी किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी तिने १८ वर्षे पूर्ण केल्यानंतरच काढता येते.

उदाहरणार्थ, जर पालकांनी मुलीच्या ५ व्या वर्षीपासून दरवर्षी १.५ लाख रुपये या योजनेत गुंतवले, तर दररोज सुमारे ४०० रुपयांची बचत करावी लागेल. ही बचत एका वर्षात १.५ लाख रुपये होईल. १५ वर्षे दरवर्षी ही गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक २२.५ लाख रुपये होईल. यावर ८.२ टक्के व्याजदरानुसार २१ वर्षांच्या शेवटी एकूण रक्कम सुमारे ७० लाख रुपये (अंदाजे ६९,२७,५७८) इतकी होऊ शकते. विशेष म्हणजे, यात व्याजातूनच सुमारे ४६.७७ लाख रुपये मिळतात.

सुकन्या समृद्धी योजना ही केवळ एक गुंतवणूक(Investment) योजना नसून मुलीच्या भविष्याची हमी देणारी सुरक्षित योजना आहे. पालकांनी या योजनेचा योग्य लाभ घेऊन आपल्या कन्येच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या सर्व गरजा सहजपणे पूर्ण करू शकतात. दररोज फक्त ४०० रुपयांची शिस्तबद्ध बचत तुमच्या मुलीच्या भविष्याला आर्थिकदृष्ट्या भक्कम आधार देऊ शकते.

हेही वाचा :

आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार?
दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर