जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा

नांदणी मठामध्ये गेली अनेक शतके श्रद्धेने जपल्या गेलेल्या माधुरी हत्तीच्या जबरदस्तीने हस्तांतरणाने संपूर्ण जैन समाजामध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे. अंबानी समूहाच्या(JIO) वनतारा प्रकल्पासाठी केवळ एका व्यवसायिक उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी झालेल्या या निर्णयामुळे समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. नांदणी मठ हे हजार वर्षांहून अधिक काळ जैन समाजाच्या परंपरा, आस्था आणि सेवा-धर्माचे प्रतीक राहिले आहे. या मठामध्ये श्रद्धेने वाढवलेली माधुरी हत्ती आज केवळ सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हिरावली जात आहे, हे संतापजनक आहे.

या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जैन समाज एकवटू लागला असून, देशभरातून सोशल मीडियावर एकच हाक दिली जात आहे – JIO च्या सर्व उत्पादने आणि सेवा यांचा बहिष्कार करा. सोशल मीडियावर हजारो वापरकर्ते JIO SIM पोर्ट करत असल्याचे दाखवत आहेत आणि या मोहिमेला अधिकाधिक जणांनी सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. अनेक संघटनांनी आणि समाजबांधवांनी आपले JIO कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट केल्याचे जाहीर करत, हाच माधुरीसाठीचा आणि परंपरेच्या रक्षणासाठीचा खरा लढा असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

ज्या कंपनीकडून आपल्या श्रद्धेच्या आणि परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचे काम सुरू आहे, त्या कंपनीची उत्पादने वापरणे म्हणजे अन्यायाला थेट पाठबळ देणे आहे, अशी भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे आता केवळ भावना नव्हे, तर कृतीतून निषेध नोंदवण्याचा हा काळ आहे. सोशल मीडियावर #BoycottJio #JusticeForMadhuri #SaveNandaniMath आणि #JioPortKara हे हॅशटॅग ट्रेंड होत असून, ही लढाई केवळ जैन समाजापुरती मर्यादित नसून, श्रद्धा, परंपरा आणि न्याय या सार्वत्रिक मूल्यांसाठी आहे.

माधुरी ही केवळ एक हत्ती नाही, ती शतकानुशतकांपासून जपली गेलेली एक संस्कृती आहे. तिच्या रक्षणासाठी उभं राहणं, हे आपल्याच अस्तित्वासाठी उभं राहणं आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की सर्वांनी मिळून एक ठोस भूमिका घ्यावी आणि न्यायासाठी एकत्रित आवाज उठवावा.

हेही वाचा :

बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

पाण्याच्या राक्षसांनी केला गेम! संधी साधत शार्कच्या ग्रुपने डायव्हरला घेरत हल्ला केला अन्… थरारक दृश्यांनी भरलेला

‘महादेवी हत्तीणी’ला मिरवणुकीने नेत असताना पोलिस गाड्यांवर दगडफेक, नांदणीत तणाव