कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ; कोल्हापूर, इचलकरंजी या दोन महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून महायुतीने गोकुळ दूध संघाच्या सत्ताकारणात शुक्रवारी थेट हस्तक्षेप केला. सत्तेचे पाटील यांच्या हातातिल गोकुळची सत्ता काढून घेऊन नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदावर बसवले. यामुळे जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांचे महत्त्व वाढले आहे, राजकीय ताकद वाढली आहे. या राजकारणात काँग्रेसच्या सतेज पाटील यांना मात्र जोरदार धक्का बसला आहे. त्यांनीच गोकुळ(Gokul ) दूध संघाची सत्ता महाडिक यांच्याकडून काढून घेतली होती.
अरुण डोंगळे यांचा राजीनामा घेऊन आमचं आघाडीचे राजकारण अबाधित आहे असं सांगितलं गेलं. महायुती किंवा महाविकास आघाडी यांचाही काही संबंध नाही असं सूचित केलं गेलं. पण महायुतीच्या प्रभावाखाली सत्ता आली पाहिजे. महाविकास आघाडीचे विशेषतः काँग्रेसचे सतेज पाटील यांचे पंख कापले गेले पाहिजेत. असा राजकीय हिशोब करून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या अर्थात गोकुळ (Gokul )च्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. त्यामुळे आणखी एक वर्षानंतर होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुती उतरली तरी पुन्हा महाडिक विरुद्ध सतेज पाटील या पारंपारिक राजकीय शत्रूमध्येच लढत होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे असलेली सत्ता हसन मुश्रीफ यांनी खेचून घेतली. गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्याची अर्थवाहिनी त्यांच्याच घरात नांदते आहे. आणि आता साडेतीन हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला गोकुळ दूध संघ सुद्धा नावेद मुश्रीफ अध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्याच ताब्यात आला आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या आणि ईडी हात धुवून पाठीमागे लागल्यामुळे मुश्रीफ कुटुंब प्रचंड अडचणीत आले होते.
“त्रास तरी किती देता? एकदाच काय त्या गोळ्या झाडा आमच्यावर”असे निर्वाणीच्या शब्दात मुस्लिम कुटुंब ईडीच्या अधिकाऱ्यांच्या समोर”व्यक्त”झाले पण अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हायजॅक केल्यानंतर सगळी राजकीय समीकरणे बदलली आणि मुश्रीफ यांच्यासमोरील संकटाची मालिका एका झटक्यात संपुष्टात आली. आणि आता तर दोन मोठ्या संस्थांची सुद्धा त्यांच्या घरात आल्यामुळे मुश्रीफांची राजकीय ताकद कोल्हापूर जिल्ह्यात वाढली आहे.
अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर “त्यांना सत्तेची हाव सुटलेली आहे”अशी त्यांच्यावर टीका करणाऱ्या हसन मुश्रीफौ यांनी गोकुळचे अध्यक्ष पद आपल्या घरात आणले आहे. महायुतीच्या प्रभावाखाली गोकुळ संघ आला पाहिजे असा विचार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असेल तर महायुतीचे अंबरीश घाटगे, अजित नरके किंवा अन्य कुणाचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित करता आले असते. पण नावेद मुश्रीफ यांची राजकीय वाट सुकर करण्यासाठी गोकुळ संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे महत्त्वाचे आहे असा राजकीय विचार हसन मुश्रीफ यांनी केलेला दिसतो.
कारण मुस्लिम यांना 20 29 ची लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीत जायचे आहे. तसे त्यांनी बोलूनही दाखवलेले आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघ नावेद साठी आणखी चार वर्षात त्यांना बांधावयाचा आहे. नावेद यांच्याकडे गोकुळचे अध्यक्ष पद नको, एकाच घरात दोन सत्ता नकोत. अशी हसन मुश्रीफ यांनी मांडलेली भूमिका ही वरवरची आहे.ती मनापासूनची आहे असे कोणी म्हणणार नाही. आमदारकीचा रस्ता”गोकुळ”(gokul) मधून जाणार असेल तर तो कोणाला नको आहे? एकूणच गोकुळ अध्यक्ष पदाच्या निमित्ताने गोकुळ मध्ये महायुतीच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे.
आम्ही हे पहिल्यांदाच घडलेले आहे. अजित दादा पवार यांनी के पी पाटील यांना आता दुसरे नेतृत्व तयार करा असे आवाहन काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात बोलताना केले होते. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना अशाप्रकारे दुसरे नेतृत्व तयार करावयाचे आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेली अनेक वर्षे गोकुळची सर्वांकष सत्ता महादेवराव महाडिक अर्थात महाडिक गटाकडे होती. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याशी युती करून गोकुळची निवडणूक लढवून ती जिंकली होती आणि गोकुळ मधून महाडिक यांची सत्ता हद्दपार केली होती. या सत्तांतराचे श्रेय सतेज पाटील यांनाच जाते. पण आता सतेज पाटील यांची राजकीय ताकद कमी करण्यासाठी महायुतीनेच हस्तक्षेप केलेला आहे.
आणखी काही महिन्यांनी कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक महायुतीला विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जिंकावयाची आहे. त्यासाठी सतेज पाटील यांच्या विश्वासातील मातब्बर कार्यकर्त्यांना फोडण्याचे एक अभियान सुरू आहे. अशावेळी गोकुळ(gokul) सारखी एक महत्त्वाची आर्थिक सत्ता सतेज पाटील यांच्या हातात असता कामा नये हा राजकीय विचार करून गोकुळ दूध संघातील आघाडीची सत्ता महायुतीच्या नेत्यांनी खालसा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना पराभवाचा जबरदस्त झटका बसला होता, आता गोकुळ दूध संघात त्यांना निष्प्रभ करून आणखी एक धक्का देण्यात आला आहे. गोकुळ दूध संघातील या घडामोडीचा प्रभाव महापालिकेच्या निवडणुकीवर पडणार आहे हे मात्र निश्चित.
हेही वाचा :