इचलकरंजी (प्रतिनिधी) :
कनवाड परिसरात कृष्णा नदीला आलेल्या पूरामुळे तब्बल ११ एकर क्षेत्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांचे हाल ऐकून घेतले.
या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. विशेषतः कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना नुकसान भरपाईची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास सांगून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यावर भर दिला.

या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याची गंभीर दखल घेत आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या असून, त्यांनी केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार यांनी दिले. “शेतकऱ्यांवर संकटाचे ओझं कमी करण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.