नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’

सेव्हन स्टार दर्जाची राज्यातील एकमेव पालिका नवीमुंबई, स्वच्छतेत महाराष्ट्राची(star) आघाडी, १० शहरांना पुरस्कार, मुंबई ३७ वरुन गेली ३३ वर

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ(star) लीग मानांकन मिळविले आहे. १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हा बहुमान मिळविणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यमंत्री माधुरी मिसाळ व मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी गुणांकन पद्धती बदललेली आहे. नेहमी अग्रभागी असलेल्या शहरांऐवजी इतर शहरांनाही क्रमवारीमध्ये पुढे स्थान मिळावे, यासाठी सुपर (star) स्वच्छ लीग ही विशेष कॅटेगरी तयार करण्यात आली आहे. पहिल्याच वर्षी सुपर स्वच्छ लीगचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने मिळविला आहे. हा बहुमान मिळविणारे राज्यातील एकमेव शहर असल्यामुळे महाराष्ट्राचा देशपातळीवर बहुमान वाढला. पालिकेने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन व ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस मानांकनही कायम राखले. महापालिकेने लाेकसहभागातून स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले. दरवर्षी लोकसहभागात वाढ होत आहे. वर्षभर सातत्याने राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ स्पर्धेत ३ ते १० लाख लोकसंख्येच्या स्वच्छ सुंदर शहरासाठी मीरा-भाईंदरने देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. गुरुवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

माणुसकीची भिंत, टाकाऊ भंगारापासून आकर्षक कलाकृतीद्वारे सुशोभीकरण, भिंतींवरील आकर्षक व विविध जनजागृतीपर संदेश देणारी चित्रे, कारंजे व चौक सुशोभीकरण, स्वच्छ व सुंदर अशी उद्याने, दुभाजक आणि शहर दैनंदिन सफाईमध्ये नेहमी दिले जाणारे विशेष लक्ष आदी उपक्रम आणि उपाययोजनांमुळे महापालिका सातत्याने स्वच्छतेबाबत अग्रणी राहिल्याचे उपायुक्त डॉ. सचिन बांगर म्हणाले. ५ तारांकित कचरा मुक्त शहर आणि वॉटर प्लस सिटी म्हणून मानांकन मिळाले आहे.

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील १० शहरे अव्वल ठरली. नवी दिल्लीत गुरुवारी झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि केंद्रीयमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारले. यावेळी नवी मुंबईचे मुख्य शहर अभियंता शिरीष आरदवाडही उपस्थित होते.

स्वच्छता अभियानात सातत्य राखून सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबईचा सहभाग झाला आहे. सर्व शहरवासीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. राज्याचा बहुमान वाढविल्याचे सर्वाधिक समाधान आहे.

हेही वाचा :

गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी

‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली