कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या किमान एक लाख तरुणांनी राजकारणात(politics) यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स इंस्टाग्राम वर काही दिवसापूर्वी केले आहे. तर 25 वर्षांपूर्वी सज्जन लोकांनी राजकारणात आलं पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले होते. दोघांच्याही आवाहना मागे स्वच्छ, निखळ आणि हेल्दी राजकारणाचा हेतू आहे.
एखादा दुसरा अपवाद सोडला तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी(politics) राजकारणाचाच चिखल केला आहे. राजकीय भांडवल करण्यासाठी त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाही. किंबहुना विषयांच्या शोधातच काही नेते मंडळी असतात. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या आनंद दिघे यांच्या मृत्यूचे भांडवल केले जात आहे, राजकारण केले जात आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय दैवत असलल्या आनंद दिघे यांच्यावर”धर्मवीर”हा चित्रपट निर्माण केला. त्याच्या प्रीमियर शो ला उद्धव ठाकरे,, संजय राऊत वगैरे उपस्थित होते. त्यांनी हा चित्रपट मध्यंतरापर्यंतच पाहिला. तेव्हा शिवसेना अविभाजित होती. त्यानंतर”धर्मवीर २”हा दुसरा भाग काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला. आणि त्यानंतर आनंद दिघे यांच्या मृत्यूवर चर्चा सुरू झाली. आनंद दिघे यांच्या मृत्यूवर धर्मवीर चित्रपटात जे भाष्य केले आहे त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले असून भंकस चित्रपट, थुकरट सिनेमा, अशी विशेषणे संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी लावताना त्यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सुद्धा फटकारले आहे.
धर्मवीर च्या दुसऱ्या भागावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्यावर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे(politics) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करून ठाकरे कुटुंबाला अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. दिघे हे शिवसेनेपेक्षा मोठे होत असल्याने काहींना आवडले नाही म्हणून त्यांचा गेम केल्याचा संशय संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
23 वर्षांपूर्वी आनंद दिघे यांचा किरकोळ अपघात झाला म्हणून त्यांना ठाणे येथील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना दाखल करून घेण्यात आल्यानंतर अवघ्या तासाभरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आनंद दिघे यांचे निधन झाले. त्यांचे निधन हा ठाण्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का होता. त्यांनी मग उपचारांमध्ये हयगय केली असा ठपका ठेवून हॉस्पिटलचे तोडफोड केली. तेव्हापासून ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटल आज तागायत बंद आहे. त्याच्याशी आनंद दिघे यांच्या मृत्यूचा संजय शिरसाट यांनी संबंध जोडला आहे. आनंद दिघे यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती, दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका कसा काय येऊ शकतो? याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केले आहे. संजय शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे आनंद दिघे यांच्या मृत्यूला मातोश्री ला जबाबदार धरले आहे.
वास्तविक आनंद दिघे हे त्यांच्या धक्कादायक मृत्यूनंतर लोकांच्या विस्मरणात गेले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईपर्यंत आनंद दिघे यांचे मृत्यू प्रकरण कोणाच्याही लक्षात नव्हते. धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला तेव्हा आनंद दिघे यांच्या बद्दल चर्चा सुरू झाली. धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
आनंद दिघे हे शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचे सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. पण त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात ठाणे क्वचितच सोडले. मुंबईत ते क्वचितच गेले होते. तेव्हा आनंद दिघे हे जिवंतपणीच एक दंतकथा बनले होते. त्यामुळेच त्यांचा आकस्मिक मृत्यू हा शिवसेनिकांसाठी धक्कादायक ठरला होता. तेव्हाही त्यांच्या मृत्यूबद्दल उलट सुलट चर्चा सुरू होती पण काही वर्षानंतर आनंद दिघे हे उर्वरित महाराष्ट्राच्या विस्मरणात गेले. ठाणे येथे त्यांच्या कार्यालयाला आता “आनंद मठ”असे नामाभिदान करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आनंद दिघे हे पुन्हा राजकारणात चर्चेचा विषय ठरले. त्यांच्या मृत्यूला आता 23 वर्षे होऊन गेली. आता इतक्या वर्षानंतर त्यांच्या मृत्यूबद्दल कुणाला तरी अप्रत्यक्षपणे जबाबदार धरणे हे चुकीचे आहे. केवळ विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून आनंद दिघे यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल केले जात आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संजय शिरसाट यांना स्पष्ट शब्दात सुनावले आहे. तुमच्याकडे त्याबद्दलचे काही पुरावे असतील तर ते द्या असे आव्हानही त्यांनी दिले आहे. इतके होऊ नये आमदार संजय शिरसाट हे आपल्या वक्तव्याशी ठाम आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासात एखाद्याच्या मृत्यूचा निवडणूक पूर्व प्रचारासाठी मुद्दा केल्याचे उदाहरण नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची नैतिक पातळी किती घसरली आहे हे लक्षात येईल.
हेही वाचा:
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
‘मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला…,’ भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान
भारताचा परकीय चलन साठा उच्चांकावर, 692.30 अब्ज डॉलरचा नवा विक्रम