इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांची  यंत्रसामग्रीसह शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

     इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. आज दि. रविवार दिनांक २९  जून रोजी महानगर पालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेसह अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


या शोभायात्रेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शोभायात्रा महानगरपालिका मुख्य कार्यालय -डॉ.
बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवतीर्थ, महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक, रसना कॉर्नर, नाट्यगृह चौक, चांदनी चौक, छत्रपती संभाजी चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा या शहरातील मुख्य मार्गावरून महानगरपालिका कार्यालयात शोभायात्रेचा समारोप झाला.
                  या शोभायात्रेत महानगरपालिकेच्या विविध विभागाकडून महानगरपालिका देत असलेल्या सोयी सुविधा या बाबतचे डिजिटल फलक लावण्यात आले होते.
महानगरपालिका पाणी पुरवठा, अग्निशमन आणि आरोग्य विभागाकडील अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता. नगर रचना विभागाचा मुलींच्या कथक नृत्य विष्कार , वाहन विभाग महानगरपालिका लोगो, लेखा परीक्षण विभाग वासुदेव, लेखा विभाग छत्रपती शाहू महाराज, ग्रंथालय विभाग शिक्षणाचे महत्त्व आदी वाहने लक्ष वेधून घेत होती. शहरातील अल्फोंसा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक आणि सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज,
राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फादर, वासुदेव, संत गाडगेबाबा आदी वेशभूषा केलेले  अधिकारी कर्मचारी लक्ष वेधून घेत होते. काही विभागांनी हालगी सारख्या वाद्यांचा वापर केला होता. शोभायात्रेत पुरुष अधिकारी कर्मचारी कुर्ता पायजमा आणि फेटा तर स्त्री अधिकारी कर्मचारी नऊवारी साडी आणि फेटा या पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.