काही दिवसांपूर्वीच ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी चॅटजीपीटीला अगदी साधं एआय(openai) टूल म्हटलं होतं. भविष्यातील एआय टूल्स त्या तुलनेत अगदीच अॅडव्हान्स असतील असं त्यांना सुचवायचं होतं. यानंतर आता कंपनीने एक नवा एआय चॅटबॉट लाँच केला आहे. हे नवीन मॉडेल सध्याच्या एआय टूल्सपैकी सगळ्यात स्मार्ट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे एआय(openai) टूल मानव आणि मशीनमधील संवाद वाढवण्यासाठी आणलं आहे. हे मॉडेल रिअल-टाईम टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ बेस्ड आहे. म्हणजेच, हे एआय मॉडेल केवळ टेक्स्ट आणि ऑडिओच नाही तर इमेज आणि व्हिडिओंना देखील समजू शकतं. तसंच तुमच्या प्रश्नांना रिअल टाईम उत्तरे देऊ शकतं.
ओपन एआयने आपल्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत GPT-4o कसं काम करतं याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये दिसतंय की एक व्यक्ती या एआय टूलसोबत चक्क मैत्रिणीशी गप्पा माराव्या त्याप्रमाणे बोलत आहे. हे टूल त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून काय झालंय असंही विचारतं. तसंच तो ज्या रुममध्ये बसला आहे हे पाहून “तू नक्कीच व्हिडिओ प्रॉडक्शन सेटवर आहेस” असंही बोलून दाखवतं.
ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत अधिक माहिती दिली. हे एक मल्टिमॉडेल एआय आहे. तसंच यामध्ये स्वतः कंटेंट जनरेशनची क्षमताही आहे. तसंच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे टूल GPT यूजर्सना मोफत मिळणार आहे. जगातलं सर्वात अत्याधुनिक एआय टूल बनवून, ते मोफत आणि जाहिरातींशिवाय उपलब्ध करणं ही अभिमानाची बाब आहे, असंही सॅम म्हणाले.
GPT-4 नंतर आलेल्या या मॉडेलचं नाव GPT-4o असं ठेवलं आहे. यातील ‘O’ या अक्षराचा अर्थ Omni असा आहे. यासोबतच कंपनी GPT-5 आणि GPT-6 वर देखील काम करत असल्याची माहिती सॅम यांनी दिली आहे.
हेही वाचा :
तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश
३ वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती १००% दयाबेन…; दिशा वकानी ऐवजी कोण येणार ?