मुद्दा – फाटक्या कपड्यांची फॅशन

दोन-अडीच दशकांपूर्वी परिधान केलेल्या(clothes) कपडय़ाला छिद्र असणे किंवा कुठेतरी थोडेसे फाटलेले असणे असभ्यपणाचे लक्षण मानले जात असे. कपडे परिधान करणाऱयालासुद्धा याविषयी लज्जा उत्पन्न होत असे. त्यामुळे कपडे जुने असले तरी ते कुठे फाटलेले नाहीत ना, याविषयी विशेष सतर्कता घेतली जात असे. त्यामुळे सुई आणि दोरा प्रत्येकाच्या घरी असायचा. सुई-दोऱयाच्या डब्यात वेगवेगळय़ा आकारांच्या सुयांसह वेगवेगळय़ा रंगांचे दोरे असत. कपडय़ाचे बटन निघाले किंवा कुठे जरासे उसवले की, घरातील आई किंवा आजी त्याच दिवशी ते शिवून टाकायच्या.

गेल्या काही वर्षांत मात्र भारतात फाटक्या कपडय़ांच्या फॅशनने चांगलाच जोर धरला आहे. जीन्स पॅन्ट खरेदी करताना तिच्यावर ठिकठिकाणी छिद्रे असलेली (clothes) जीन्स विकत घेण्यामध्ये हल्लीच्या तरुण-तरुणींचा कल वाढताना दिसत आहे. पॅन्टनंतर आता जीन्स शर्ट आणि जॅकेट्ससुद्धा छिद्रे असलेली बाजारात मिळू लागली आहेत. तरुण वर्गाकडून अशा फाटक्या कपडय़ांनाच अधिक पसंती असल्याने समस्त कपडय़ांच्या दुकानात आणि ऑनलाइन खरेदीच्या संकेतस्थळांवर हे फाटके कपडे सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत. नेहमीच्या कपडय़ांपेक्षा या कपडय़ांना अधिक मागणी असल्यामुळे हे फाटके कपडे चढय़ा दराने विकले जात आहेत. यूथ आयकॉन असलेले सिने कलाकार, खेळाडू हेसुद्धा अशा प्रकारचे फाटके कपडे वापरत असल्याने तरुणांमध्ये या कपडय़ांचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. पाश्चात्य देशांतून आलेल्या या फॅशनचा तरुण-तरुणींनी सहजपणे स्वीकार केल्याने फाटके कपडे वापरणे आता सर्वत्र नॉर्मल झाले आहे. ही फॅशन भारतात नव्यानेच आली तेव्हा आरंभी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना, शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱयांना अशा प्रकारचे फाटके कपडे परिधान करून येण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता मात्र ही फॅशन सर्वत्र रुजल्याने अनेक ठिकाणांहून ही बंदी उठवण्यात आली आहे. पाल्यांनी फाटके कपडे परिधान करण्यामध्ये पालकांनाही काही अनुचित वाटत नसल्याने त्यांच्या मागणीनुसार पालकसुद्धा त्यांना असले फाटलेले कपडे आणून देऊ लागले आहेत. असे फाटके कपडे परिधान करणे म्हणजे कुठेतरी आपण सध्याच्या जीवनमानासोबत जात आहोत असे आजच्या तरुण वर्गाला वाटत आहे.

भारतात व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी कोणते कपडे घालावेत यावर बंधने नसली तरी फॅशनच्या नावाखाली अशा प्रकारे फाटके कपडे घालणे खरंच योग्य आहे का? फाटक्या जीन्स घालून तरुणी सार्वजनिक ठिकाणी सहजपणे वावरत असतात. भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात महिलांवरील अत्याचाराचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. हल्लीच्या वेब सीरिज, चित्रपट आणि मालिकांतून खुलेपणाने दाखवली जाणारी प्रणयदृश्ये, यातील तरुण नायिकांचा तोकडय़ा कपडय़ांतील मुक्त वावर, प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये सहजपणे उपलब्ध होणारे पॉर्न चित्रपट हे या वाढत्या महिला अत्याचाराला कारणीभूत ठरत आहेत. अशा प्रकारच्या कपडय़ांच्या माध्यमातून अंगप्रदर्शन करणे आपल्या सभ्य संस्कृतीला नक्कीच साजेसे नाही. स्पंदनशास्त्रानुसार मोडक्या वस्तू आणि फाटलेले कपडे यांतून प्रचंड प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. या वस्तूंचा वापर करणाऱयाच्या मनावरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा वस्तू आणि कपडे वापरणे आणि त्या घरात ठेवणे योग्य नसते. त्यामुळेच पूर्वी फुटक्या बशा, मोडकी भांडी तत्परतेने घराबाहेर काढली जात असत. फाटलेले कपडे तत्परतेने शिवले जात असत. काळ बदलला तशी विभक्त कुटुंबपद्धती भारतात प्रचलित होऊ लागली. घरातील आजी-आजोबा गावाकडे राहू लागली. कर्ता पुरुष आणि स्त्रिया शहराकडे वळल्या. परिणामी पुढच्या पिढीला परंपरागत शास्त्र सांगणारे, काय बरोबर आणि काय चुकीचे सांगणारे घरात कुणीच उरले नाही. त्याचा परिणाम आज आपल्याला घरोघरी दिसत आहे. पाश्चात्यांकडून काय घ्यावे आणि काय घेऊ नये याची जाण नसलेली आजची पिढी फॅशनच्या नावाखाली कुठेतरी विकृतीला बळी पडू लागली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. सात्त्विक वेशभूषा कशी असावी याबाबतची सविस्तर माहिती आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन ग्रंथांतून मांडून ठेवली आहे. त्याचे आचरण आजची पिढी केवळ सण-उत्सवांच्या वेळी पह्टो सेशनसाठीच करताना दिसते. भारतीय सात्त्विक वेशभूषेची भुरळ आज विदेशींनाही आहे. त्यामुळे पर्यटनासाठी जेव्हा ते भारतात येतात तेव्हा येथील वेशभूषा परिधान करतात, येथील प्रथा-परंपरा जाणून घेतात, येथील धार्मिक उत्सवांत आणि कार्यक्रमांत सहभागी होतात. आपण मात्र त्यांनी त्यागलेल्या गोष्टी अंगीकारून स्वतःला आधुनिक म्हणवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा :

कोल्हापूर : गोकुळची पूर्ण ताकद लावतो, अध्यक्षांचा थेट मुख्यमंऱ्यांना फोन

PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात

तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत