“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मीरा-भाईंदर येथे बिगर मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी आणि मराठी लोकांच्या मोर्चाला प्रतिबंध असा पोलीस(Police) प्रशासनाचा दुजाभाव मंगळवारी उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाला. मराठी एकीकरण समिती आणि उबाठा सेना, मनसे यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या “मी मराठी “च्या मोर्चात प्रचंड संख्येने मराठी माणूस सहभागी झाला होता.

सरकारच्या संदर्भात एक वेगळा प्रतिकूल संदेश सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जात असल्याचे लक्षात येताच राज्य शासनाने या मोर्चाला परवानगी दिली. या मोर्चाच्या वतीने राज्य शासनाला तसेच पोलीस(Police) प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर मीरा भाईंदर येथे मराठी माणसाचा बिगर मराठी समाजाच्या मुजोरीपणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याचा निर्णय झाला होता.”चलो, मीरा-भाईंदर”असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले होते.

या मोर्चात मराठी माणूस एकवटणार, मोर्चाचे स्वरूप विराट असणार हे लक्षात घेऊन राज्य शासनाने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मनसेचे एक नेते अविनाश जाधव यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी मध्यरात्रीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी मीरा-भाईंदर मध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. हा आदेश जारी करण्यात आल्यामुळे आंदोलकांना सहज ताब्यात घेण्याचा अधिकारच पोलिसांना मिळाला होता.

मोर्चासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस मीरा-भाईंदर मध्ये येऊ लागताच पोलिसांनी(Police) बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तंग बनले. पहिल्या दोन तासात शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनांमध्ये ढकलले. पण पोलिसांची वाहने कमी आणि आंदोलकांची संख्या प्रचंड त्यामुळे अटक करायची तरी किती जणांना हा प्रश्न पोलिसांना पडला होता. मराठी माणसाच्या मोर्चाला प्रतिबंध करून महाराष्ट्रात मराठी माणसाला शासनाकडून कसे अवमानित केले जाते, हे चित्र महाराष्ट्रातील मराठी माणसांनी मंगळवारी पाहिले.

मराठी माणसाच्या मोर्चाला पोलीस प्रशासनाचा विरोध नाही, पण त्यांनी मोर्चाचा मार्ग बदलावा, मीरा भाईंदर ऐवजी घोडबंदर येथे मोर्चा काढावा असे पोलिसांचे मत होते, पण जिथे बिगर मराठी लोकांचा मोर्चा निघाला त्याच ठिकाणी आमचा मोर्चा निघेल असे ठाम पणाने सांगितले गेल्यानंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र वेगळाच सूर या निमित्ताने लावलेला दिसला.

आमचा मोर्चाला विरोध नाही, पण मोर्चाचा हेतू चांगला नाही असे त्यांनी भाष्य करून मराठी माणसाला डिवचले. त्यामुळे आंदोलकात संतापाची लाट उसळली. आणि ते स्वाभाविक होते. आमदार नरेंद्र मेहता यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले.
राज्य शासनाचा, पोलीस(Police) प्रशासनाचा मराठी मोर्चाला विरोध नव्हता तर मग मध्यरात्रीच धरपकड का करण्यात आली? जमावबंदी आदेश कशासाठी लागू करण्यात आला? याचा अर्थ असा होतो की, पोलीस प्रशासनाला मराठी माणसाचा मोर्चा काढू द्यायचा नव्हता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला विरोध नव्हता, मोर्चाच्या ठिकाणावरून निघणार होता त्या ठिकाणाला विरोध होता आणि म्हणूनच पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून मोर्चाला परवानगी नाकारली असा खुलासा त्यांनी केला. पोलीस प्रशासनाच्या या निर्णयावरून महायुतीमध्ये सुद्धा काहीशी अस्वस्थता दिसून आली. महायुती मधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस प्रशासनाचा चक्क निषेध केला आणि ते स्वतः मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरा-भाईंदर कडे यावयास निघाले, तथापि त्यांनाही मराठी माणसाचा रोष पत्करावा लागला. मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि मग मोर्चात या अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी काढता पाय घेतला.

इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मराठी माणसात तीव्र नाराजी पसरली. ठाकरे बंधूंनी हिंदी भाषा विरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने हिंदी भाषा विषयक निर्णय मागे घेतले. याच दरम्यान काही बिगर मराठी व्यक्तींनी आम्ही मराठी बोलणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आणि मोर्चा काढला. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी अशी व्याख्या मराठी बद्दलची आहे. पण आम्ही मराठी नाही आहोत अशी मुजोर भूमिका केडिया वगैरे लोकांनी घेतली. त्याचा एकत्रित परिणाम मंगळवारच्या मराठी माणसाच्या मोर्चात दिसून आला. मीरा भाईंदर ऐवजी घोडबंदर येथे मोर्चा काढा ही पोलिसांची(Police) भूमिका म्हणजे दुटप्पीपणाचा कळस होता.

मराठी माणसाचा हा मोर्चा बिगर राजकीय होता पण या मोर्चाचे नेतृत्व अविनाश जाधव, अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे या मनसेच्या नेत्यांनी केले होते. इथे जमलेला मराठी माणूस सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या मंडळींनी दिला आणि तो राजकीय नव्हता असे म्हणता येणार नाही.

मराठी विरुद्ध बिगर मराठी असे वातावरण मुंबई आणि आसपासच्या परिसरात तयार झाले आहे आणि त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. विशेषतः महाविकास आघाडी आणि महायुतीला मुंबई महापालिका ताब्यात घ्यावयाची आहे. त्यासाठी आत्तापासूनच मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

हेही वाचा :

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

देशभरातील सुमारे 25 कोटी कर्मचारी आज संपावर; बँकांसह इतर कामांवर नेमका काय होणार परिणाम?

रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral