कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन गणेश पूजा(Ganesh Pooja) केली. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असल्याने त्यावर आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक सरन्यायाधीश चंद्रचूड हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशावेळी ते पंतप्रधानांच्या प्रभावाखाली येऊन काही निर्णय घेतील अशी परिस्थिती नाही किंवा सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाची निगडित अशी प्रलंबित प्रकरणे आहेत आणि त्यावर या गणेशचे पूजनाचे प्रतिकूल परिणाम होतील असेही नाही. म्हणूनच पंतप्रधानांच्या या गणेश पूजनाकडे निखळपणे पाहिले पाहिजे त्याचे राजकारण होता कामा नये.
पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानी धार्मिक हेतू ठेवून जाऊ नये असे भारतीय संविधानात कुठेही म्हटलेले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच गणेश पूजा करण्यासाठी सर्व न्यायाधीशांच्या निवासस्थानी गेल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली आहे आणि ते स्वाभाविक आहे. जे सर्व सामान्य जनतेला अधिकार आहेत तेच अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आहेत.केंद्र शासनाची निगडित काही संवेदनशील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात विशेषतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर अंतिम सुनावणीसाठी आहेत किंवा निकालावर आहेत अशी स्थिती असेल तर पंतप्रधानांनी गणेश पूजेसाठी तेथे जाणे नैतिकतेला धरून नाही असे फार तर म्हणता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व न्यायाधीशांच्या निवासस्थानी गेले म्हणून नव्हे तर तेथे जाऊन त्यांनी गणेश पूजा(Ganesh Pooja) केली याबद्दल इंदिरा जयसिंग तसेच प्रशांत भूषण वगैरे जेष्ठ वकिलांनी आक्षेप घेतला आहे किंवा कसे हे समजत नाही मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सरन्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानी गणेश पूजनासाठी किंवा अन्य कारणांसाठी गेले तर त्याचा प्रभाव न्यायपालिकेवर पडू शकतो असे ज्येष्ठ वकिलांना सुचित करावयाचे असेल. म्हणूनच प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांच्यासाठी आचारसंहिता असली पाहिजे अशी मागणी केली आहे. याचा अर्थ पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी जाणे ही सर्वसाधारण घटना आहे असा होतो. पंतप्रधानांनी कुठे जावे आणि कुठे जाऊ नये याचे काही संविधानिक संकेत आहेत का? याचा खुलासा घटना तज्ञांनी केला पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन तेथे गणेशाची पूजा करणे ही त्यांची कृती पूर्णपणे खाजगी स्वरूपाची आहे. त्यांची ही कृती कुणाला अनुचित तर कुणाला उचित वाटते आहे.घटनात्मक पदावर जी कुणी व्यक्ती आहे, ती ज्या धर्माची असेल, त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे तिला स्वातंत्र्य आहे. यापूर्वी राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तसेच लालकृष्ण अडवाणी हे गृहमंत्री होते तेव्हा तसेच पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या निवासस्थानी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही महिन्यापूर्वी मुंबईत बोहरा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गेले होते. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या काही दिवसापूर्वीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या होत्या. घटनात्मक पदावरील व्यक्तींनी कुठल्याही धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा दर्शनासाठी जाऊ नये असे घटनेत कुठेही म्हटलेले नाही.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन गणेश पूजा केली ही सर्वसाधारण घटना आहे. पण तेव्हा त्याबद्दल कोणीही आक्षेप घेतलेले नव्हते. तथापि पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी जाऊन तेथे गणेश पूजा करणे हे पहिल्यांदाच घडले आहे आणि म्हणूनच त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व न्यायाधीशांच्या निवासस्थानी जाऊन तेथे गणेश पूजा केली याबद्दल अद्याप तरी कोणत्याही राजकीय पक्षाने त्यावर टीका टिपणी केलेली नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी मात्र गणेश पूजा करत फिरण्यापेक्षा, त्यांनी मणिपूर मध्ये जावे असा सल्ला दिला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गणेश पूजेचे समर्थन केले असून, त्यामुळे न्यायाचा
अपलाप होत नाही असे म्हटले आहे.
हेही वाचा:
सांगली महापालिकेला रोज एक लाख रुपये दंड; कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी कारवाई
ईदची सुट्टी कधी 16 की 18 सप्टेंबर? महाराष्ट्र सरकारने केला मोठा बदल
ट्रॅफिक पोलिसांना सुट्टी! आता AI करणार वाहतूक नियंत्रणाचे काम