महायुती आणि मविआ कडून आश्वासनांची केलीय बरसात!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने किती पाळली जातात? किंवा पाळण्यासाठी, पूर्तता करण्यासाठी ती दिली जातात काय? हा संशोधनाचा विषय असला तरी निवडणुकीतील(politics) एक नित्याचा उपचार म्हणून ते प्रसिद्ध केले जातात. आता मात्र जाहीरनाम्याच्या माध्यमातून सामान्य माणसाला थेट व्यक्तिगत पातळीवरील लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महायुती अंतर्गत भारतीय जनता पक्षाने(politics) संकल्प पत्र म्हणून तर महाविकास आघाडीने महाराष्ट्र नामा म्हणून जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात दोन्हीकडून आश्वासनांची बरसात करण्यात आली आहे. शिवाय महाराष्ट्रातील समस्त महिलांना दरमहा दोन ते तीन हजार रुपये, तसेच मोफत बस प्रवास सुविधा देण्याचे जाहीर करून खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.

शंभर युनिटचे वीज बिल माफ करणार, महिलांना वर्षाला फक्त पाचशे रुपये प्रति अशी सहा सिलेंडर देणार, महिलांसाठी बस प्रवास पूर्णपणे मोफत, आरक्षणाची 50% ची मर्यादा हटवणार, महिलांच्या बँक खात्यावर दरमहा 3000 रुपये जमा करणार अशा पाच गॅरंटीज महाविकास आघाडीने दिल्या आहेत. शिवाय शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करणार, जातनिहाय जनगणना, संजय गांधी निराधार योजनेची रक्कम दोन हजार रुपये करणार, अशी आश्वासने देण्यात आली आहेत. महायुती सरकारकडून राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या योजनेवर टिकेचा भडीमार सुरू करण्यात आला होता.

ही योजना अव्यवहार्य आहे. सरकारची तिजोरी रिकामी करणारी आहे, विकास योजना वरील तरतूद या योजनेसाठी वापरली जाणार आहे किंवा वापरली जात आहे, राज्यातील विकास कामे या योजनेमुळे ठप्प होणार. महिलांना अशा प्रकारे रोख पैसे देण्याऐवजी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या अशा प्रकारची टीका शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले वगैरे नेत्यांनी सुरू केली होती.

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे(politics) सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येईल अशी साधार भीती वाटणाऱ्या महा विकास आघाडी कडून आता यु टर्न घेतला गेला आहे. महायुती 2100 रुपये देणार असेल तर आम्ही सत्तेवर आल्यास तीन हजार रुपये दरमहा देऊ, महायुतीकडून महिलांना एसटी बस प्रवासात त 50 टक्क्यांची सवलत दिली असेल तर आम्ही राज्यातील महिलांसाठी एसटी बस प्रवास पूर्णपणे मोफत करू अशी आश्वासने दिली आहेत.

संकल्प पत्र असे नाव दिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. तसा हा जाहीरनामा महायुतीचाच म्हणावा लागेल. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने तसेच अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत.

राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये, गड किल्ले विकास प्राधिकरण, छतावरील जीएसटीवर शेतकऱ्यांना थेट अनुदान, शेतकऱ्यांना कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, दहा लाख विद्यार्थ्यांना वेतन, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिल 30 टक्के कमी करणार, बळजबरीने किंवा फसवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करणार अशी आश्वासने संकल्प पत्रात देण्यात आली आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रात पहिली 10 आश्वासने ही महायुतीची आहे आणि उर्वरित पंधरा आश्वासने भारतीय जनता पक्षाची आहेत. राज्यात सत्ता आल्यास संकल्प पत्राच्या पूर्ततेसाठी मंत्री समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीकडून संकल्प पत्राच्या पूर्ततेचे प्राधान्यक्रम ठरवण्यात येतील असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर(politics) संकल्प पत्र जाहीर करताना चौफेर टीका केली तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करताना महायुतीवर टीकेचे आसूड ओढले आहेत. दोन्ही आघाडीने परस्परांवर टीका करणे हे स्वाभाविक आहे. दोन्ही आघाड्यांकडून आश्वासनांची बरसात करताना, आश्वासनांच्या पूर्ततेसाठी निधी कोणत्या मार्गाने उपलब्ध करणार याबद्दल काहीही सांगितलेले नाही. अर्थात सत्ता आल्यानंतर त्याचे उत्तरदायित्व सत्ताधाऱ्यांना घ्यावे लागणार आहे.

जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या आश्वासनांना यापूर्वी सर्वसामान्य जनतेकडून गांभीर्याने घेतले जात नव्हते. निवडणुकीपूर्वी जाहीरनामाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आश्वासनाबद्दल सर्वसामान्य जनतेने संबंधित पक्षांना तसेच सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले असले तरी यापूर्वी असे काही घडलेले नाही. आता मात्र सर्वसामान्य जनतेला थेट लाभार्थी करून घेण्याचे आश्वासन तुम्ही आखाड्यांच्याकडून दिले गेले असल्यामुळे आश्वासनाबद्दल सर्वसामान्य जनता जागरूक राहील आणि आश्वासनांचे काय झाले याची आठवणही करून देईल.

हेही वाचा :

.Air India च्या उड्डाणादरम्यान हिंदू, शीख प्रवाशांना…; खाण्यापिण्यासाठीचा नवा नियम लागू

सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर

राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावट